राजेश्वर ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी नागपूर कार्यकारिणी बरखास्त करून मोठ्या बदलाचे संकेत दिले होते. त्यामुळे नवीन कार्यकारिणी देऊन त्यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणे अपेक्षित होते. परंतु कार्यकारिणी जाहीर केली नाही आणि दोन शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. ते देखील जुन्याच कार्यकारिणीतील पदाधिकारी आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी पक्षाची नागपूर कार्यकारिणी बरखास्त करून नेमके काय साध्य केले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांना पक्षातून काढण्याची मागणी विदर्भातील काही पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यातूनच नागपूर शहर आणि जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्याची घोषणा खुद्द राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचे कारण, पक्ष स्थापनेपासून नागपुरात हवा तसा पक्ष वाढला नाही, असे ठाकरे यांनी सांगितले होते. मनसेच्या नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर पक्ष स्थापनेपासून प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांचा प्रभाव राहिला आहे.
हेही वाचा : पक्षांतराच्या चर्चेला मिलिंद नार्वेकरांचा पूर्णविराम
मात्र, राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात हेमंत गडकरी यांना दूर ठेवले होते. तसेच नागपूर कार्यकारिणी बरखास्त करून गडकरी यांना योग्य तो संदेश दिला होता. परंतु त्यांना प्रदेश कार्यकारिणीवर कायम ठेवले. नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नाही, पण बरखास्त कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. मनसेने विशाल बडगे आणि चंदू लाडे असे दोन शहरप्रमुख केले आहेत. तर नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आदित्य दुरुगकर यांची नियुक्ती केली आहे. दुरुगकर यांच्याकडे सध्या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. उर्वरित नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव पुढील महिन्यात नागपूर दौऱ्यावर येणार आहेत, असे पक्षाने सांगितले आहे.
गेल्या दीड दशकात नागपुरात पक्ष वाढला नाही. नागपूर आणि जिल्ह्यात एकही नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य नाही. तरीही कार्यकारिणीत पुन्हा तेच चेहरे देण्यात राज ठाकरे यांनी धन्यता मानली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आणि नागपूर कार्यकारिणी बरखास्तीची घोषणेमुळे नागपूर जिल्ह्यातील पक्षाची स्थिती सुधारण्याचे चिन्हे दिसत नाहीत.