ठाणे : महायुतीच्या जागावाटपात बहुचर्चीत ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदरात पडताच, ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ या निवास्थानी भेट घेऊन मतदारसंघात सभा घ्याव्यात, असे साकडे घातले. या विनंतीनुसार राज ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. नारायण राणे व एकनाथ शिंदे या शिवसेनेतील जुन्या सहकाऱ्यांसाठी राज ठाकरे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली ठाणे लोकसभेची जागा अखेर शिंदे गटाला मिळाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. ठाण्यातून नरेश म्हस्के तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून डाॅ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. त्यानंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवाांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपाकडून नेत्याची हकालपट्टी?

मुंबईसह ठाणे आणि कल्याण पट्ट्यात राज ठाकरे यांना मानणारा एक वर्ग आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात राजू पाटील यांच्या रूपाने मनसेचा एकमेव आमदार असून ते यापूर्वीच श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांना ७४ हजार मते मिळाली होती. भाजप उमेदवार संजय केळकर यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी अविनाश जाधव यांना मतांची रसद पुरविल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. असे असले तरी ठाणे आणि कल्याणात राज ठाकरे यांना मानणारा मतदार अधिक प्रमाणात आहे. राज्यभर सुरू असोल्या महायुतीच्या सभामध्ये अजूनही राज ठाकरे यांनी सहभाग घेतला नव्हता. ठाणे कल्याणात मात्र राज सभा घेतील असा दावा श्रीकांत शिंदे यांनी केला.

हेही वाचा : हिंदुत्ववादी महिला असदुद्दीन ओवेसींचा गड भेदणार का?

राणे यांच्या प्रचारार्थ सभा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राज ठाकरे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी शनिवारी कोकणात सभा घ्यावी, असे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांनी अजून सभेसाठी मान्यता िलेली नाही, असे मनसेच्या गोटातून सांगण्यात येत आहे. राणे आणि शिंदे यांच्यासाठी सभा घेतल्यास शिवसेनेतील जुन्या सहकाऱ्यांसाठी राज ठाकरे हे सभा घेतील. शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्यास धनुष्यबााणाला मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांना करावे लागेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray lok sabha campaign rally only for eknath shinde and narayan rane print politics news css