संतोष प्रधान
आक्रमक हिंदुत्वाबरोबहच राज्याला भेडसावणारे प्रश्न मांडून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याच्या माध्यमातून नववर्षाची सुरुवात दणक्यात केली असली तरी ठोस राजकीय भूमिका घेत पक्षाला पुढे घेऊन जावे लागणार आहे. याशिवाय जनतेचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
शिवाजी पार्कवरील पाडवा मेळाव्याला मनसेने शक्तिप्रदर्शन चांगलेच केले. मैदान सारे भरले होते. राज्याच्या विविध भागांतून मनसैनिक शिवतीर्थावर धडकले होते. तासभराच्या भाषणात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडलीच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवित आपण सरकारबरोबर नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडत असताना भाजपच्या विरोधात अवाक्षरही काढले नाही.
हेही वाचा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दलच राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल
मशिदींवरील भोंग्याचा विषय ठाकरे यांनी पुन्हा हाती घेतला. गेल्या वर्षी हाच मुद्दा त्यांनी हाती घेतला होता. पण जनतेला हा मुद्दा तेवढा भावला नाही असेच जाणवते. कारण भोंगे हटविण्याच्या मागणीवर तेवढी तीव्र प्रतिक्रिया उमटली नव्हती. तेव्हा राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. उद्धव ठाकरे यांना शह देण्याकरिता राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय उरकून काढल्याची तेव्हा सार्वत्रिक भावना झाली होती.
मशिंदीवरील भोंगे हटविण्याकरिता राज ठाकरे यांनी एक महिन्याची मुदत सरकारला दिली आहे. भाजप ठाकरे यांना किती मोठे करते यावर सारे अवलंबून आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून शिवसेनेला धक्का दिला. ठाकरे की शिंदे यापैकी कोणत्या शिवसेनेले जनाधार आहे, हे निवडणूक निकालांमधून स्पष्ट होईल. पण ठाकरे गटात चलबिचल करण्यात भाजप यशस्वी झाला. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे भाजपच्या लेखी महत्त्व किती आहे ? मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा फायदा होणार असेल तरच भाजप राज ठाकरे यांचा वापर करून घेईल. यामुळेच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुूद्द्यावर कितीही आक्रमक भूमिका घेतली तरीही भाजपचे कितपत पाठबळ मिळते यावरच सारे अवलंबून असेल.
हेही वाचा… रायगडात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश लाड पुन्हा नाराज?
आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या मतांमध्ये राज ठाकरे किती फूट पाडू शकतात याचही भाजप अंदाज घेईल. कारण मोदी-शहा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. हे उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत स्पष्ट झाले. यामुळे केवळ हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाकरिता राज ठाकरे यांचा वापर भाजप करणार नाही.
हेही वाचा… कृषीमंत्र्यांच्या अंधारातील धावत्या दौऱ्याने शेतकरी नाराज
राज ठाकरे यांना जनतेचा विश्वास संपादन करण्यावर भर द्यावा लागणार आहे. सभेतील गर्दी आणि मतांमध्ये होणारे रुपांतर याचे गणित फार वेगळे असते. मनसेबद्दल जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला. २०१९च्या निवडणुकीत ‘लाव रे व्हिडिओ’तून ठाकरे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच राज ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घेतले. ठोस भूमिका घेत त्यांना पुढे जावे लागणार आहे.