मुंबई : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माहीम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी भेटण्यास गेले होते. पण ठाकरे यांनी भेट नाकारल्याने सरवणकर यांनी उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. भेटीनंतर राज ठाकरे जो आदेश देतील तो पाळणार होतो. भेट घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता, असा दावाही सरवणकर यांनी केला.
विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माहीम विधानसभा मतदारसंघात लक्षवेधी राजकीय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी काही तास शिल्लक असताना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी दादर येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर सरवणकर हे थेट राज ठाकरे यांना न भेटता त्यांनी प्रथम मुलगा समाधान सरवणकर आणि काही पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांच्या निवासस्थानी पाठवले. त्यांनी सरवणकर यांना भेटायचे आहे, असा निरोप दिला. मात्र राज ठाकरे यांनी सरवणकर यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला.
हेही वाचा >>>ठाण्यात शिंदे गटातील बंडखोरांचे भाजपसमोर मोठे आव्हान
राज ठाकरे यांना भेटण्यास माझा मुलगा आणि काही पदाधिकारी गेले होते, पण त्यांनी आमची भेट नाकारली. मला काही बोलायचे नाही. तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर लढवा, उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा असेल तर मागे घ्या, नाही तर नका घेऊ, मला यावर कोणतीही चर्चा करायची नाही, असा निरोप ठाकरे यांनी पाठविल्याचे सरवणकर यांनी सांगितले.