राजेश्वर ठाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्ष स्थापनेला दीड दशकाहून अधिक काळ झाल्यावरही विदर्भात पाया रोवू न शकलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या भागात राजकीय जमीन शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. असे असले तरी मनसे या भागात खरोखरच बाळसे धरू शकेल याबाबत राजकीय विश्लेषक साशंक आहेत.

राज ठाकरे हे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी त्यांचा दौरा आहे. पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. ते दोन दिवस नागपुरात नागपूर शहर, ग्रामीण तसेच भंडारा-गोंदिया येथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. रविभवन येथे आयोजित बैठकीत पहिल्या दिवशी नागपूर शहर व ग्रामीण येथील कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली.

हेही वाचा… जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणार ?

राज ठाकरे स्टाईलने गर्दी खेचून घेणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांना पाहायला ऐकायला तुफान गर्दी होते. नागपुरात त्यांच्या आगमनप्रसंगी गर्दी झाली. मात्र यावेळेच्या दौऱ्यात त्यांचा चाहता वर्ग फारच कमी झाल्याचे दिसून आले. पक्षाचे कार्यकर्ते नसले तरी राज ठाकरे यांची झलक पाहण्यासाठी गोळा होणाऱ्यांची संख्या रोडवली आहे.

हेही वाचा…भाजपचे लक्ष्य बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ,’मिशन -४५’ अंतर्गत नियोजनबद्ध तयारी

नागपूर आणि विदर्भात तर पक्षाची अत्यंत वाईट स्थिती आहे. ९ मार्च २००६ रोजी जन्म झालेल्या या पक्षाचा एकही नगरसेवक नाही. जिल्हा परिषद सदस्य तर फारच दूरची गोष्ट आहे. मनसे विदर्भात दखलपात्रही नाही. शिवसेनेपेक्षा कित्येकपटीने मनसेची बिकट अवस्था आहे. राज ठाकरेंमुळे गर्दी जमते. पण त्याचा फायदा पक्ष विस्तारासाठी होत नाही. त्यामुळे तळागळात मनसचे कुठेच नाही. राजकीय जमीन शोधून ती कसण्याचे कसब या पक्षाला दाखवता आले नाही. नागपूर महापालिकेत तर या पक्षाचे अस्तित्वच नाही. कधीकाळी एक नगरसेवक होता. आता तर निवडून येण्याची क्षमता असलेले कार्यकर्ते त्यांच्याकडे नाही. जे कार्यकर्ते आहे ते निवडून येऊ शकत नाही आणि ते पक्षदेखील वाढवू शकत नाही, अशी मनसेची नागपुरातील स्थितीआहे. इतर जिल्ह्यातील चित्र या पेक्षा वेगळे नाही. शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटाचे किंवा मूळ शिवसेनेचे काही नेते गळाला लागतील का याची चाचपणी या दौ-यात ठाकरे करणार आहेत.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे त्यांच्या विदर्भ दौ-यात कार्यकर्ते नेत्यांना कोणता कानमंत्र देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray vidarbha visit will help to strengthen mns in region print politics news asj