ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जाहीर सभांचे नियोजन आखले जात असतानाच, मनसे प्रचार सभांमध्ये आघाडी घेतली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची राज्यातील पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी सभा ठाण्यात होणार आहे. उद्या, सोमवारी होणाऱ्या या सभांच्या निमित्ताने राज हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यात सत्ताबदल झाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या सत्ता बदलाचा केंद्रबिंदू आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा यामुळे ठाणे जिल्ह्याचे राजकीय महत्व गेल्या अडीच वर्षात वाढले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघांमध्ये ४७ इच्छूकांचे ७८ उमेदवारी अर्ज छाननी प्रकियेत बाद झाले असून जिल्ह्यात ३३४ उमेदवारांचे ४१७ अर्ज वैध ठरले आहेत. सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून यानंतर उमेदवाराची यादी अंतिम होऊन प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा-गडचिरोलीत आत्राम, गेडाम, मडावी बंडखोरीवर ठाम, होळी, कोवासे, कोवे माघार घेण्याची शक्यता?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जाहीर सभांचे नियोजन आखले जात असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची राज्यातील पहिली जाहीर सभा डोंबिवली आणि त्यानंतर ठाण्यात होणार आहे. गेल्या निवडणूकीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनसेचे प्रमोद (राजू) पाटील हे एकमेव आमदार निवडून आले होते. त्यांच्याच मतदार संघात राज यांची पहिली सभा सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्याच दिवशी त्यांची दुसरी सभा ठाणे शहर मतदार संघातील ब्रह्मांड चौकात होणार आहे. राज यांनी जिल्ह्यातील विविध मतदार संघात उमेदवार उभे केले असले तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोपरी- पाचपाखाडी मतदार संघात उमेदवार उभा केलेला नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पुत्र व कल्याण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज यांनी कळव्यात जाहीर सभा घेतली होती. त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलले असून मनसे उमेदवारांविरोधात शिंदेच्या सेनेने आणि भाजपाने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या सभेत ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या जाहीर सभांच्या माध्यमातून राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातुन निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे दिसून येते.

आणखी वाचा-शिराळ्यातील बंडोबाना थंड करण्यात भाजपला यश

सभा कुठे?

कल्याण ग्रामीणचे मनसेचे उमेदवार प्रमोद पाटिल यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा होणार असून ही सभा सोमवार सायंकाळी ४ वाजता श्री महावैष्णव मारुती मंदिर, पी & टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता राज यांची दुसरी सभा ठाणे येथील ब्रह्मांड चौकात पार पडणार आहे. मनसेचे ठाणे शहर मतदार संघातील उमेदवार अविनाश जाधव, ओवळा- माजीवडा मतदार संघातील उमेदवार संदीप पाचंगे, कळवा- मुंब्रा मतदार संघातील उमेदवार सुशांत सूर्यराव यांच्या प्रचारासाठी ही दुसरी सभा होणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackerays election campaign will start from chief minister eknath shindes thane district print politics news mrj