संपूर्ण राज्यात मराठा-ओबीसींमध्ये आरक्षणावरून मतभेद निर्माण झाल्याचे चित्र असताना नाशिक मतदारसंघात या दोन्ही मतपेढ्या एकत्र राहिल्याने सफेद सदरा, पायजमा, गळ्यात मफलर अशा अस्सल ग्रामीण पेहरावात वावरणारे शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे सहजपणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजकारणात असूनही राजकारणी नसणारे हे व्यक्तिमत्व. सर्वपक्षीयांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे प्रचारात विरोधकांनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करणे टाळले. राजाभाऊंनीही कुणावर टीका केली नाही. पक्षीय पातळीवर कितीही चिखलफेक झाली असली तरी वाजे हे त्यापासून अलिप्त राहिले. ठाकरे गटाने एकनिष्ठतेच्या निकषावर त्यांना उमेदवारी देत शिवसेना शिंदे गटाला धूळ चारली. वाजे यांनी २०१४ मध्ये सिन्नर विधानसभेचे शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले होते. २०१९ मध्ये अवघ्या २०७२ मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पराभूत होऊनही जनसेवा मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य थांबले नाही. सिन्नरमध्ये कधीही, कुणालाही ते सहजपणे उपलब्ध असतात.

हेही वाचा – जे. पी. नड्डा यांच्यानंतर दलित वा महिला नेतृत्वाला मिळणार भाजपा अध्यक्षपदाची संधी?

हेही वाचा – सरपंच ते ओडिशाचे पहिले भाजपा मुख्यमंत्री; कोण आहेत मोहन चरण माझी?

राजाभाऊंचे आजोबा शंकरराव वाजे हे आमदार होते. वडील प्रकाश वाजे हे देखील राजकारणात होते. कौटुंबिक राजकीय वारसा असूनही ते मात्र अनेक वर्षे सक्रिय राजकारणापासून दूर राहिले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत वडिलांचा पराभव झाल्यामुळे ते राजकारणात आले. त्यांची शेती, पेट्रोलपंप आहे. वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. सामान्य व्यक्ती म्हणून सर्व घटकांशी जुळवलेली नाळ त्यांना लोकसभेच्या विजयापर्यंत घेऊन गेली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajabhau waje nashik shivsena thackeray group simplicity is the face print politics news ssb