रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघात चुरस वाढली आहे. या पाचही मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र या विधानसभेमध्ये राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून उभे असलेले किरण सामंत आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या “लेकी ” प्रचार सभेत गुंतलेल्या दिसून येत आहेत. वडिलांना आमदारकी मिळावी यासाठी या दोन्ही उमेदवारांच्या मुली घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार राजन साळवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत हे उभे आहेत. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचाराची धुरा त्यांची लेक अपूर्वा किरण सामंत हिने हाती घेतली आहे. राजापूर लांजा मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम ती सध्या करत आहे. वडिलांना आमदारकी मिळावी यासाठी लेकीची धडपड किती कामी येणार हे निवडणुकीच्या निकालावरून लक्षात येणार आहे. याबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांची लेक स्वामिनी प्रशांत यादव प्रचारात उतरली असून वडिलांच्या विजयासाठी मतदारांच्या गाटीभेटी घेत वडिलांनाच मतदान करण्याचे भावनिक आवाहन करीत आहे. स्वामिनी आणि अपुर्वा या दोघीही मतदारांना भावनिक साद घालत असल्याने मतदारदेखील भारावून जात आहेत.
हेही वाचा – आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
राजापूर लांजा या मतदारसंघाबरोबर चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात सध्या प्रचाराची चांगलीच चुरस रंगली आहे. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सर्वच मतदारसंघात होणारी निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. प्रशांत यादव आणि किरण सामंत यांचे अगदी नातेवाईक देखील तहान-भूक विसरुन प्रचाराला लागले आहेत. प्रशांत यादव यांची कन्या स्वामिनी चिपळूण शहरासह अनेक ठिकाणी आपल्या वडिलांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन करत आहेत. यादव आणि सामंत यांच्या लेकींनी मतदारसंघातून सुरू केलेल्या प्रचाराला मतदार वर्गातून देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.