केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानसह एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये येत्या २५ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, भाजपाने आपल्या ४१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही खास रणनीती आखली आहे. भाजपाने येथे एकूण सात खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याच कारणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला भाजपाकडून तिकीट मिळेल आणि आम्ही जोमात निवडणूक लढवू अशी आशा बाळगणाऱ्या स्थानिक नेत्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण ४१ जणांचा समावेश
भाजपाने २०१८ साली कोणत्याही खासदाराला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले नव्हते. तेव्हा राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याकडे राजस्थान भाजपाचे नेतृत्त्व होते. त्या निवडणुकीत फक्त आमदार आणि स्थानिक नेत्यांनाच तिकीट देण्यात आले होते. राजस्थानमध्ये भाजपाचे एकूण २५ खासदार आहेत. भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण ४१ जणांचा समावेश आहे. यात एकूण ७ खासदारांचा समावेश आहे. लवकरच भाजपा आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर करणार आहे. या यादीतही काही खासदारांचा समावेश असू शकतो. याच कारणामुळे राजस्थान भाजपामध्ये स्थानिक पातळीवर असंतोष निर्माण झाला आहे.
राजस्थानमध्ये कोणकोणत्या खासदारांना विधानसभेचे तिकीट
भाजपाने दिया कुमारी आणि राज्यवर्धनसिंह राठोड या विद्यमान खासदारांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदेश दिला आहे. कुमारी या राजसमंदच्या खासदार आहेत. त्या जयपूरच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. २०१९ साली खासदार होण्यापूर्वी त्या सवाई माधोपूर या विधानसभा मतदारसंघातून २०१३ आणि २०१८ साली आमदार होत्या. कुमारी राज्य कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. त्यांना विध्याधरनगर या मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. राठोड हे दोन वेळा खासदार तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले आहेत. ते भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांना झोटवारा या मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. राठोड आणि कुमारी या दोन्ही नेत्यांना तुलनेने सुरक्षित अशा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदासंघांत वसुंधरा राजे यांच्या समर्थक नेत्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना डावलून कुमारी आणि राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
साधू बाबा बालकनाथ यांनाही उमेदवारी
तिजारा विधानसभा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे. या जागेसाठी भाजपाने हिंदू धर्मीय साधू बाबा बालकनाथ यांना उमेदवारी दिली आहे. बालकनाथ हे सध्या अलवर या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. झुंझूनू मतदारसंघाचे खासदार नरेंद्र कुमार यांनादेखील मांडवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. कुमार यांनी २०१८ साली मांडवा या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे कुमार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिली होता. त्यानंतर मांडवा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रिटा चौधरी यांचा विजय झाला होता. आता पुन्हा एकदा कुमार यांना याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
अन्य महत्त्वाच्या खासदारांना विधानसभेचे तिकीट
भाजपाने जाहीर केलेल्या आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सध्या खासदार असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. म्हणजेच या नेत्यांना आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. यामध्ये राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीना, अजमेरचे खासदार भगिरथ चौधरी, जालोर-सिरोही मतदारसंघाचे खासदार देवीज पटेल यांचादेखील समावेश आहे.
दरम्यान, या खासदारांना विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिल्यानंतर स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिक नेते तिकीट मिळतील या आशेपोटी पक्षाचे काम करत होते. मात्र ऐनवेळी या खासदारांना तिकीट मिळाल्यामुळे या नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपाला याच नाराजीचा फटका बसू शकतो.
भाजपाच्या अनेक नेत्यांत नाराजी
भाजपाचे नेते विकास चौधरी यांनी २०१८ साली किशनगड येथून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यांना भाजपातर्फे पुन्हा एकदा तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्याऐवजी आता भगिरथ चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच कारणामुळे इंडियन एक्स्प्रेसशी बोलतांना त्यांनी भाजपावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्यापुढे निवडणूक लढवण्याशिवाय कोणता पर्याय आहे. २००८ सालापासून मी भाजपात सक्रिय आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत मला एकूण ६५ हजार मते मिळाली होती. यावेळी मात्र भाजपाने ७० वर्षीय उमेदवाराला तिकीट दिले आहे. यालाच तरुणांना संधी देणे म्हणतात का?” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“नाराज नेत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू”
भाजपाचे नेते तथा तिलजारा मतदारसंघाचे माजी आमदार ममनसिंह यादव यांनीदेखील पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ते बालकनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. या उमेदवारांची नाराजी बघता भाजपाने सावध पवित्रा घेतला आहे. राजस्थान भाजपाचे प्रभारी अरुणसिंह यांनी मंगळवारी या नाराजीवर प्रतिक्रिया दिली. नेत्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे अरुणसिंह म्हणाले.