विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेससह भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे. ही निवडणूक आम्हीच जिंकणार असा दावा दोन्ही पक्षांचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे यातीलच काही नेते आपली राजकीय सोय पाहून पक्षबदल करताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये येत्या २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्याआधीच आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमधील माजी आमदार आणि माजी मंत्री अशा दोन मोठ्या नेत्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. प्रत्यक्ष मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना या दोन नेत्यांचा भाजपाप्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
कोणकोणत्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
माजी मंत्रई राम गोपाल बैरवा आणि अशोक तंवर या दोन नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. तंवर हे चक्सू या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी पी जोशी, खासदार राज्यवर्धन सिंह राठोड तसेच अन्य नेते उपस्थित होते. तंवर आणि बैरवा यांच्यासह यावेळी काँग्रेसच्या अन्य कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला.
“रक्षकच भक्षक होत असतील तर”
हा पक्षप्रवेश झाल्यानंतर जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजस्थानमध्ये नुकतेच एका पोलीस उपनिरीक्षकाने एका मुलीवर कथित बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर येथील राजकीय वातावरण तापले आहे. याच प्रकरणाचा उल्लेख जोशी यांनीदेखील केला. राजस्थानचे सरकार महिलांना संरक्षण पुरविण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यात संरक्षण करणारेच भक्षक झाले असतील संरक्षणाची अपेक्षा कोणाकडून करावी, असा सवाल जोशी यांनी केली.
“काँग्रेसच्या जंगलराजला आम्ही कंटाळलो”
तर भाजपात प्रवेश करताना तंवर आणि राम गोपाल बैरवा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसच्या जंगलराजला आम्ही कंटाळलो होतो. म्हणूनच आम्ही भाजपात प्रवेश केला आहे, असे या नेत्यांनी सांगितले.