विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या २५ नोव्हेंबर रोजी येथे मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे. याच कारणामुळे काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यासाठी तर भाजपा काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी प्रयत्नरत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने ब्राह्मण, राजपूत अशा वरिष्ठ जातीतील तसेच अनुसूचित जाती, अुसूचित जमाती, मागास प्रवर्गातील अनेक नेत्यांना तिकीट दिले आहे.
ओबीसी समाजाच्या एकूण ५० नेत्यांना तिकीट
भाजपाच्या उमेदवारांच्या यादीचे जातीय विश्लेषण केल्यास अनेक गोष्टी समोर येतात. आपल्या पारंपरिक उच्च जातीय राजपूत, ब्राह्मण आणि बनिया समाजाच्या मतदारांशिवाय भाजपाने या निवडणुकीत मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मतदारांना आकर्षित करण्याचा विशेष रुपाने प्रयत्न केला आहे. भाजपाने या निवडणुकीत ओबीसी समाजाच्या एकूण ५० नेत्यांना तिकीट दिले आहे. हे प्रमाण एकूण जागांच्या ३० टक्के आहे. राजस्थानमध्ये ओबीसी प्रवर्गात जाट समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. या समाजातील ३१ नेत्यांना भाजपाने तिकीट दिले आहे. त्यानंतर ओबीसीत मोडणाऱ्या यादव, कुमावत, बिश्नोई, सैनी, पटेल, नागर, रावण राजपूत, धाकड आदी समाजाच्या ३० नेत्यांना तिकीट देण्यात आले आहे.
अति मागास प्रवर्गातील १० नेत्यांना तिकीट
अति मागास प्रवर्गात (एमबीसी) गुज्जर समाजाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या समाजातील १० नेत्यांना भाजपाने तिकीट दिले आहे. ओबीसी आणि एमबीसी प्रवर्गाला दिलेल्या तिकिटांची संख्या पाहायची झाल्यास हा आकडा ७० च्या घरात जातो. हे प्रमाण एकूण तिकिटांच्या ३५ टक्के आहे.
अनुसूचित जातीतील ३५ नेत्यांना तिकीट
भाजपाने अनुसूचित जातीच्या एकूण ३५ नेत्यांना तिकीट दिले आहे. राजस्थानमध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण ३४ जागा राखीव आहेत. भाजपाने खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरही एका दलित नेत्याला उमेदवारी दिली आहे. हे प्रमाण एकूण तिकिटांच्या १७.५ टक्के आहे. भाजपाने आदिवासी समाजातील एकूण २९ नेत्यांनाही तिकीट दिले आहे. यातील चार नेत्यांना राखीव नसलेल्या जागांसाठी तिकीट देण्यात आले आहे. म्हणजेच भाजपाने एकूण २०० जागांपैकी साधारण १४.५ टक्के जागांवर एसटी समाजाच्या नेत्यांना तिकीट दिले आहे.
उच्च जातीतील एकूण ६३ उमेदवार
उच्च जातीला देण्यात आलेल्या प्रतिनिधित्वाचा विचार करायचा झाल्यास भाजपाने राजपूत समाजाच्या २७, ब्राह्मण समाजाच्या १९ नेत्यांना तिकीट दिले. यासह १७ जगांवर जैन, सिंधी, राजपुरोहित, पंजाबी समाजाच्या नेत्यांना तिकीट दिले आहे. एकूण २०० जागांपैकी ६३ जागांवर भाजपाने उच्च जातीतील नेत्यांना तिकीट दिले आहे. हे प्रमाण ३१.५ टक्के आहे.
एकाही मुस्लीम नेत्याला तिकीट नाही
भाजपाने एकूण २० महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. हे प्रमाण एकूण जागांच्या १० टक्के आहे. इतर जातीतील नेत्यांना प्रतिनिधित्व मिळालेले असले तरी या निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लीम नेत्याला तिकीट दिलेले नाही. २०१८ सालच्या निवडणुकीत या पक्षाने युनूस खान या एकमेव मुस्लीम चेहऱ्याला तिकीट दिले होते. खान २०१८ सालच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. यावेळी तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.
भाजपाने कोणत्या जातीला किती प्रतिनिधीत्व दिले
एकूण जागा २००
ओबीसी- ६० जागा (३१-जाट, २९-अन्य ओबीसी जाती)
एमबीसी- १० जागा (सर्व गुज्जर)
ओबीसी आणि एमबीसी एकूण जागा- ७०
उच्च जातीचे उमेदवार -एकूण ६३ जागा
राजपूत- २७
ब्राह्मण- १९
व्यापारी आणि अन्य जाती- १७
अनुसूचित जाती- ३५ उमेदवार
अनुसूचित जमाती- २९ उमेदवार
महिला उमेदवार – २०
शीख- ३
मुस्लीम – ०