राजस्थानमध्ये येत्या २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्ने केले जात आहेत. तर ही निवडणूक पुन्हा जिंकून आपली सत्ता कायम राखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ही निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकण्याचा विश्वास काँग्रेस पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. असे असले तरी काँग्रेस पक्षातील अनेक नेते तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत. याच नाराजीमुळे राजस्थानमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्त्यावर उतरल्याचे असून हीच नाराजी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे.

“प्रत्येकालाच आनंदी ठेवणं अशक्य”

काँग्रेस पक्षाने ३१ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची तिसरी आणि चौथी यादी जाहीर केली. काँग्रेसने एकूण २०० जागांपैकी आतापर्यंत १५६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तिसरी आणि चौथी यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. कारण तिकीट न मिळाल्यामुळे किंवा तिकीट दिले जावे यासाठी राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात नाराज नेत्यांना कसे संतुष्ट करायचे, असा प्रश्न काँग्रेसच्या नेतृत्वासमोर उभा ठाकला आहे. यावर बोलताना ‘प्रत्येकालाच तिकीट देणे आणि आनंदी ठेवणे शक्य नाही. मात्र ज्या नेत्यांना तिकीट नाकारण्यात आलेले आहे, त्यांना सरकार आल्यास वेगवेगळ्या मंडाळांमध्ये पद दिले जाईल,’ असे राजस्थानचे मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रमुख नेते अशोक गहलोत यांनी सांगितले.

तीन महत्त्वाच्या नेत्यांना अद्याप तिकीट नाही

काँग्रेसने आतापर्यंत आपल्या उमेदवारांच्या एकूण चार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र या एकाही यादीत मंत्री शांती धारीवाल, महेश जोशी आणि धर्मेंद्र राठोड या महत्त्वाच्या नेत्यांची नावे नाहीत. याच कारणामुळे या तिन्ही नेत्यांचे समर्थक थेट रस्त्यावर उतरले आहेत.

महेश जोशी यांच्या समर्थकांची मुख्यालयासमोर निदर्शने

बुधवारी (१ नोव्हेंबर) काँग्रेसच्या जयपूर येथील मुख्यालयासमोर काँग्रेसच्या काही कार्यकार्त्यांनी निदर्शने केली. हे आंदोलक महेश जोशी यांचे समर्थक होते. जोशी हे हवामहल या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघासाठी अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही. २०२० सालच्या बंडात जोशी सहभागी होते. तसेच त्यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे नेतृत्व जोशी यांना तिकीट देण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपाच्या तुलनेत काँग्रेसपुढे अधिक अडचणी

दरम्यान, नाराज नेत्यांना संतुष्ट करण्याबाबत भाजपाच्या तुलनेत काँग्रेसला मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण राजस्थानमध्ये एकूण ५४ मतदारसंघ असे आहेत, ज्यांना काँग्रेस गेल्या तीन निवडणुकांत जिंकू शकलेला नाही. काँग्रेसकडे पूर्ण प्रभूत्व असलेले मतदारसंघही भाजपाच्या तुलनेत कमी आहेत. सरकारची स्थापना करायची असेल तर १०१ हा बहुमताचा आकडा पार करणे गरजेचे आहे. असे असताना नाराज नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे किंवा विरोधी पक्षातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरवल्यास, काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? काँग्रेस पक्ष नाराज नेत्यांना संतुष्ट करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader