विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विजयाचे गणित साधण्यासाठी अनेक पक्ष आपापल्या स्तरावर इतर पक्षांशी युती करत आहेत. राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) हा पक्षदेखील राजस्थानमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. ही निवडणूक लढवताना आरएलडी पक्षाने काँग्रेसशी युती केली आहे.
भारतपूर जागेसाठी आरएलडी-काँग्रेस यांच्यात युती
आरएलडी हा पक्ष भारतपूर ही एकमेव जागा लढत आहे. या जागेसाठी आरएलडीने काँग्रेसशी युती केली आहे. सध्या या जागेवर आरएलडी पक्षाचे सुभाष गर्ग हे आमदार आहेत. २०१८ सालच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते निवडून आले होते. २०१८ सालच्या निवडणुकीत आरएलडी पक्षाने एकूण दोन जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यातील भारतपूर जागेवर या पक्षाने विजय मिळवला होता. तर मालपुरा या जागेवर आरएलडी पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. गर्ग सध्या राजस्थान सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत.
आरएलडी पक्ष काँग्रेससाठी काम करणार
गर्ग हे मूळचे काँग्रेसेचे नेते होते. २०१८ सालच्या निवडणुकीत त्यांनी भारतपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या मतदारसंघात जाट समाजाच्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. हाच विचार करून काँग्रेसने ही जागा आरएलडी पक्षाला दिली होती. त्यामुळे गर्ग यांनी आरएलडीचे उमेदवार म्हणून २०१८ सालची निवडणूक लढवत विजय मिळवला होता.
आरएलडीच्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा
सध्याच्या निवडणुकीत भारतपूर या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि आरएलडी या दोन्ही पक्षांनी युती केली आहे. या जागेवर पुन्हा एकदा गर्ग यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत गर्ग यांनी ‘काँग्रेस का हाथ, आरएलडी के हँड पम्प के साथ’ असा नारा दिला आहे. आरएलडी इतर जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. राजस्थानमध्ये एकूण ५३ मतदारसंघांत जाट समाजाचे मतदार आहेत. ही मते काँग्रेसच्या पारड्यात पडावीत म्हणून आरएलडी पक्ष प्रयत्न करत आहे.
भाजपाच्या बंडखोर नेत्याचा अर्ज मागे
भारतीय जनता पार्टीने २०१८ साली भारतपूर या जागेसाठी गर्ग यांच्याविरोधात विजय कुमार बन्सल यांना उमेदवारी दिली होती. मात्र बन्सल यांचा १५ हजार ७१० मतांनी पराभव झाला होता. २०२३ सालच्या या निवडणुकीतही भाजपाने बन्सल यांनाच उमेदवारी दिली आहे. तिकीट न मिळाल्यामुळे या निवडणुकीत भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष गिरीधारी तिवारी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाने विनंती केल्यानंतर त्यांनी आपला हा अर्ज मागे घेतला आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत तिवारी यांनी भारत वाहिनी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना ३७ हजार १५९ मते मिळाली होती. त्यांना भाजपाच्या उमेदवारापेक्षा फक्त १ हजार ७५२ कमी मते मिळाली होती.
काँग्रेसचे माजी नेते गिरीश कुमार मैदानात
या जागेसाठी काँग्रेसचे माजी नेते गिरीश कुमार यांनी बंडखोरी करत भारतपूर या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते भारतपूर महापालिकेचे माजी महापौर आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. आता ते बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
भाजपाच्या विजयासाठी आरएसएस, व्हीएचपी सरसावले
दुसरीकडे भाजपा उमेदवाराच्या विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी), तसेच विद्या भारती यासारख्या काही संस्था पुढे आल्या आहेत. त्यामुळे या जागेवर कोणाचा विजय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.