विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षाने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने अनेक आकर्षक आश्वासनं दिली आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध करताना राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते सचिन पायलट आदी नेते उपस्थित होते. या राज्यात येत्या २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही ९६ टक्के आश्वासनं पूर्ण केली- गहलोत

काँग्रेसने राजस्थानच्या जनतेला सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच तरुणांसाठी नवी रोजगारनिर्मिती केली जाईल, असेही काँग्रेसने म्हटले. जाहीरनामा प्रसिद्ध करताना आम्ही आमची ९६ टक्के आश्वासनं पूर्ण केलेली आहेत, असा दावा अशोक गहलोत यांनी केला. तसेच लोकांनी केलेल्या सूचनेच्या आधारावरच आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे, असेही अशोक गहलोत यांनी सांगितले.

अशोक गहलोत नेमकं काय म्हणाले?

“उत्तर भारतात राजस्थान हे राज्य आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून प्रथम क्रमांकावर आहे. या वर्षाच्या शेवटी राजस्थानची अर्थव्यवस्था ही १५ लाख कोटी रुपये होईल. २०३० सालापर्यंत ही अर्थव्यवस्था ३० लाख कोटीपर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे”, असेही अशोक गहलोत म्हणाले.

जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याला ‘जन घोषणा पत्र’ असे नाव दिले आहे. या जाहीरनाम्यात काँग्रेसने एकूण सात महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. पंचायत पातळीवरील नोकरभरतीसाठी नवी योजना आखली जाईल. चार लाख नव्या नोकऱ्या निर्माण केल्या जातील. तसेच राजस्थानमध्ये आम्ही जातीनिहाय जनगणना करू, अशी आश्वासनं काँग्रेसने दिली आहेत.

काँग्रेसने दिलेली प्रमुख आश्वासनं

  • कुटुंबप्रमुख महिलेला वर्षाला १० हजार रुपयांची आर्थिक मदत
  • राज्यातील १.०४ कोटी कुटुंबांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर
  • पशुपालकांकडून दोन रुपये प्रति किलोप्रमाणे शेणाची खरेदी
  • चिरंजिवी आरोग्य विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम २५ लाखांहून ५० लाखांवर.
  • शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे निवृत्तीवेतन दिले जाईल. त्यासाठी कायदा केला जाईल.
  • शासकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप आणि टॅब.
  • नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी प्रत्येक कुटुंबाचा १५ लाखांचा विमा.

अशी काही प्रमुख आश्वासनं काँग्रेसने दिली आहेत.

खरगे यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

दरम्यान, हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “आमच्यावर टीका करण्याव्यतिरिक्त मोदी यांनी काहीही केलेले नाही. ते राहुल गांधी यांच्यावर टीका करतात. मलादेखील ते शिवीगाळ करतात. अशोक गहलोत यांनाही त्यांनी लक्ष्य केलं. भाजपा आमच्याच योजनांची नक्कल करते. मात्र, भाजपाने आमची कितीही नक्कल केली तरी राजस्थानमध्ये आम्हीच सत्तेत येऊ”, असे खरगे म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan assembly election 2023 update congress releases its manifesto prd
Show comments