विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे २५ नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील काँग्रेसची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद लावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात मोदी यांनी राजस्थानच्या जनतेला भावनिक आवाहन केले असून, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या पत्रात भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हेगारीमध्ये राजस्थान अव्वल : नरेंद्र मोदी

काँग्रेस पक्षाचे राजस्थान राज्याशी जुने वैर आहे, असे वाटतेय. याच वैरामुळे काँग्रेसने पाच वर्षांत राजस्थान राज्यावर सूड उगवला आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी गहलोत सरकारवर भ्रष्टाचार, महिलांवर अत्याचार वाढले असल्याचाही आरोप केला. राजस्थान राज्य गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य झाले आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काँग्रेसने गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली नाही. या असामाजिक घटकांशी काँग्रेसने हातमिळवणी केली, असा आरोप मोदी यांनी केला.

राजस्थानमध्ये महिला असुरक्षित : नरेंद्र मोदी

सध्या राजस्थानमध्ये एखाद्यावर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती राहिलेली नाही. राजस्थान ही अशी भूमी आहे; जेथे महिलांच्या सन्मानासाठी अनेकांनी बलिदान दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत हे राज्य महिलांसाठी असुरक्षित झाले आहे. याच कारणामुळे राजस्थानच्या महिलांनी येथील काँग्रेसचे सरकार उलथवून लावण्याचे ठरवले आहे, असेही मोदी म्हणाले.

एकीकडे भाजपावर टीका करताना मोदी यांनी दुसरीकडे स्वत:च्या पक्षाची वाहवा केली. भाजपाने नेहमीच राजस्थान राज्याची भरभराट आणि विकासाचा विचार केलेला आहे. राजस्थानमध्ये आमची सत्ता आल्यास, आम्ही सर्वप्रथम पाण्याच्या समस्येवर काम करू. हा आमच्या अजेंड्यातील सर्वोच्च प्राधान्य असलेला विषय असेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले.

भ्रष्टाचाराविरोधात कठोर मोहीम राबवू : नरेंद्र मोदी

“आमचा कष्ट, प्रगती व प्रतिष्ठेचा मार्ग आहे. आमची सत्ता आल्यास राजस्थानमध्ये डबल इंजिन सरकार असेल. या राज्यातील सरकार हे वेगाने विकास करणारे असेल. आमचे सरकार गरीब लोकांचा आदर करील. आम्ही भ्रष्टाचाराविरोधात कठोर मोहीम राबवू. आमच्या सरकारचा हाच मूलमंत्र असेल,” असे मोदी राजस्थानच्या जनतेला उद्देशून म्हणाले.

२५ नोव्हेंबर रोजी मतदान; ३ डिसेंबरला मतमोजणी

दरम्यान, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. येथे एकूण २०० जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan assembly election 2023 update pm narendra modi open letter to rajasthan people urges vote for bjp criticizes ashok gehlot and congress prd