विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या राजस्थानमधील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री सचिन पायलट आणि विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील वाद थेट दिल्लीपर्यंत गेला होता. मात्र सध्यातरी या नेत्यांतील वाद समोर आलेला नाही. असे असले तरी राजस्थान काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्थिरता आणि वाद सुरू आहे, असा दावा केला जात आहे. यावरच आता सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते राजस्थानच्या टोंक या भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबाबतही भाष्य केले.
“एकत्रित बसून आम्ही निर्णय घेऊ”
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी काँग्रेसमधील कथित अंतर्गत वाद आणि अस्थिरतेवर भाष्य केले. “आमच्या पक्षात आम्ही एकमेकांचा आदर करतो. सामूहिक नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. आम्ही सध्याची निवडणूक एकत्रितपणे लढवू. बहुमत मिळाल्यानंतर आमचे सर्व आमदार एकत्र बसतील आणि कोणाकडे नेतृत्व द्यायचे हे ठरवतील. या प्रक्रियेशी कोणाला अडचण असेल तर त्यांनी आपली ही अडचण केंद्रीय नेतृत्वाकडे घेऊन जावी. आमच्या पक्षाचे हेच धोरण आहे. हाच इतिहास आहे,” असे सचिन पायलट म्हणाले.
“या वर्षीही हाच नियम पाळला जाईल”
“सध्यातरी एकजुटीने लढण्याचा आणि निवडणूक बहुमतात जिंकण्याचा आमचा विचार आहे. लोकांनी आम्हाला बहुमत दिलेच तर आम्ही आमदार एकत्र बसू. २०१८ सालीदेखील याच पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. या वर्षीदेखील हाच नियम पाळला जाईल. सध्यातरी ही निवडणूक बहुमतात जिंकण्यावर आमचा भर आहे,” असेही सचिन पायलट म्हणाले.
२५ नोव्हेंबर रोजी मतदान, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी
काँग्रेसने सचिन पायलट यांना टोंक या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सध्या याच मतदारसंघाचे ते आमदार आहेत. या जागेसाठी भाजपाने अजित सिंह मेहता यांना उमेदवारी दिली आहे. ते टोंक या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. राजस्थानमध्ये येत्या २५ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.
काँग्रेसला मिळाल्या होत्या ९९ जागा
दरम्यान, २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २०० पैकी ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपाला ७३ जागांवर विजय मिळाला होता. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा घेऊन अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.