केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानसह एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. ही घोषणा होताच काँग्रेस, भाजपासह त्या-त्या राज्यांतील प्रादेशिक पक्ष कामाला लागले आहेत. भाजपानेही छत्तीसगडसह राजस्थानमध्ये आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यावेळी मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपाने आगळीवेगळी रणनीती आखली आहे. भाजपाने एकूण सात खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
भाजपाने जाहीर केली ४१ उमेदवारांची यादी
राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने सोमवारी (१० ऑक्टोबर) आपल्या ४१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीतील एकूण सात उमेदवार सध्या खासदार आहेत. उमेदवारी जाहीर केलेल्या ४१ जागांपैकी भाजपाकडे फक्त एक जागा आहे.
राजस्थानमध्येही मध्य प्रदेशप्रमाणेच रणनीती
भाजपाने राजस्थानमधील एकूण २४ पैकी सात खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशमध्येही भाजपाने हीच रणनीती राबवली आहे. भाजपाने विद्याधरनगरचे आमदार नरपतसिंह राजवी आणि झोतवारा मतदारसंघाचे माजी आमदार राजपालसिंह शेखावत या दोन दिग्गज नेत्यांना तिकीट नाकारले आहे. नरपतसिंह हे माजी मुख्यमंत्री व माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचे जावई आहेत. नरपतसिंह आणि राजपालसिंह हे दोन्ही नेते माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे समर्थक असल्याचे म्हटले जाते.
खासदार राज्यवर्धनसिंह राठोड यांना झोतवारा मतदारसंघातून तिकीट
विद्याधरनगर या जागेसाठी भाजपाने राजसमंदच्या खासदार दिया कुमारी यांना तिकीट दिले आहे. दिया कुमारी या जयपूरच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. २००८ सालापासून नरपतसिंह राजवी हे सातत्याने विद्याधरनगर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. जयपूर ग्रामीण मतदारसंघाचे खासदार राज्यवर्धनसिंह राठोड यांना झोतवारा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. माजी आमदार रजापलसिंह शेखावत यांना येथून उमेदवारी दिली जाईल, असा तर्क बांधला जात होता. मात्र, ऐन वेळी राज्यवर्धन राठोड यांना उमेदवारी देण्यात आली. शेखावत यांनी २००८ आणि २०१३ सालच्या निवडणुकीत याच जागेवर विजय मिळवला होता. २०१८ सालच्या निवडणुकीत मात्र ते पराभूत झाले होते.
सवाई माधोपूर जिल्ह्यात विस्तारण्याचा भाजपाचा प्रयत्न
राज्यसभा खासदार किरोडीलाल मीना यांनादेखील यावेळी विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदेश भाजपाने दिला आहे. ते पूर्व राजस्थानमधील सवाई माधोपूर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. ते आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत. सवाई माधोपूर मतदारसंघात भाजपाने २०१८ साली समाधानकारक कामगिरी केली नव्हती. सवाई माधोपूर या भागात मीना यांना मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणूनच भाजपाला या जिल्ह्यात पक्षाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. सवाई माधोपूर या जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण चार जागा आहेत. भाजपाला २०१८ साली पूर्व राजस्थान जिल्ह्यातील एकूण २४ जागांपैकी फक्त एक जागा जिंकता आली होती.
अन्य कोणकोणत्या खासदारांना निवडणूक लढवण्याचा आदेश?
अलवर जिल्ह्याचे खासदार बाबा बालकनाथ यांनादेखील विधानसभा निवडणूक लढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. ते अलवर जिल्ह्यातील तिजरा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. तसेच झुंझूनूचे खासदार नरेंद्रकुमार हे झुंझूनू जिल्ह्यातील मांडवा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. अजमेरचे खासदार भगीरथ चौधरी हे अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथून निवडणूक लढवणार आहेत. जालोर-सिरोहीचे खासदार देवजी पटेल हेदेखील सांचोर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
अन्य महत्त्वाच्या नेत्यांनाही उमेदवारी
गुज्जर समाजाचे नेते विजय बैंसला हे भाजपाच्या तिकिटावर देवळी-उनियारा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. गुज्जर समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी मोठा लढा उभारला होता. ते दिवंगत कर्नल किरोरीसिंह बैंसला यांचे पुत्र आहेत. माजी खासदार सुभाष महारिया हेदेखील राजस्थानच्या राजकारणात महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनादेखील भाजपाने सीकर जिल्ह्यातील लच्छमनगड या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सध्या या मतदारसंघाचे आमदार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोतसरा हे आहेत.
काँग्रेस आणि भाजपापुढे वेगवेगळी आव्हाने
दरम्यान, २०१९ सालापासून भाजपाचा वेगवेगळ्या नऊ निवडणुकांपैकी एकूण आठ निवडणुकांत पराभव झालेला आहे. या आठ निवडणुकांमध्ये सात पोटनिवडणुकांचा समावेश आहे. दुसरीकडे राजस्थानच्या जनतेने तीन दशकांत कोणत्याही एका पक्षाच्या हाती सलग सत्ता सोपवलेली नाही. म्हणजेच प्रत्येक पाच वर्षांनंतर येथे सत्तापालट झालेला आहे. याच कारणामुळे पोटनिवडणुकांत विजय झालेला असला तरी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपली सत्ता कायम राखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे असेल. काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपालाही तेवढ्याच ताकदीने प्रयत्न करावे लागतील.