नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांत विधानसभेसाठी मतदान होणार आहे. मागच्या निवडणुकीतील प्रत्येक मतदारसंघातील गणिते पाहून यावेळी काय रणनीती आखावी, याचा विचार प्रत्येक पक्ष करत आहे. २०१८ साली राजस्थानमधील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. अतिशय कमी मताधिक्क्याने काही मतदारसंघात दोन्ही पक्षांचा जय-पराजय झाला होता. त्यामुळे या जागांवर यावेळी विशेष लक्ष दिले जात आहे.
२०१८ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत नऊ जागा एक हजारपेक्षा कमी मतांच्या फरकाने, सात जागा दोन हजारपेक्षा कमी मतांच्या फरकाने काँग्रेस आणि भाजपा यांनी जिंकल्या होत्या. या निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. भाजपाने ७३ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने ९९ जागांवर शिक्कामोर्तब केले होते. विधानसभा निवडणुकीनंतर रामगढ जागेसाठी पोटनिवडणूक झाली, त्यातही काँग्रेसने विजय मिळवून १०० जागांवरील विजय निश्चित केला.
हेही वाचा : चंद्रावर सापडलेल्या खनिजातून समोर आले चंद्राचे खरे वय; काय सांगते नवीन संशोधन…
विधानसभेच्या ३८ जागांवर अटीतटीची निवडणूक झाली होती. यातील २९ जागांवर एक हजार ते पाच हजारांचे मताधिक्क्य होते, तर नऊ जागा या एक हजारपेक्षा कमी मतांच्या फरकांनी जिंकलेल्या होत्या.
हेही वाचा : हमास-इस्रायल युद्ध: पॅलेस्टाईनच्या समर्थनासाठी समाजमाध्यमांवर ‘कलिंगड’ का वापरण्यात आले?
एक हजारपेक्षा कमी मतांचा फरक असणाऱ्या जागांमध्ये भिलवाडामधील असिंद मतदारसंघाचा समावेश आहे. या जागेवर भाजपाच्या जब्बारसिंग संखला यांनी काँग्रेसच्या मनीष मेवारा यांचा अवघ्या १५४ मतांनी पराभव केला होता. पिलीबंगा ही जागा भाजपाने केवळ २७८ मतांनी जिंकली होती. खेत्री मतदारसंघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र सिंग यांनी ९५७ मतांनी जिंकलेला. फतेहपूर येथे काँग्रेसचे आमदार हकम अली खान आणि पोकरण येथे शाले मोहम्मद हे अनुक्रमे ८६० आणि ८७२ मतांनी विजयी झाले होते. शाले मोहम्मद हे अशोक गहलोत यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक व्यवहारमंत्री झाले होते.
हेही वाचा : सरसंघचालकांच्या भाषणात वोकवादाचा उल्लेख, काय आहे या संकल्पनेचा इतिहास
मतांच्या कमी फरकाने विजयी झालेल्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ आमदार आणि विद्यमान विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांचा समावेश आहे. ते चुरूमधून केवळ १,८५० मतांनी विजयी झाले होते. पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य असणारे मतदारसंघ सूरजगड, मांडवा, दांता रामगढ, खंडेला, शाहपुरा, चोमू, फुलेरा, मालवीय नगर, चाक्सू, तिजारा, बेहरोर, नादबाई, बांदीकुई, बेवार, मसुदा, मकराना, मारवाड जंक्शन. भोपाळगड, पाचपदरा, सिवाना, चोहटन, रानीवारा, गोगुंडा, वल्लभ नगर, सागवारा, घाटोल, बेगुन, भीम, बुंदी, सांगोड, छाबरा आणि खानापूर हे आहेत.