राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थान काँग्रेसमधील दोन मातब्बर नेते मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद अधिकृतपणे संपुष्टात आला असला तरी मागच्या पाच वर्षांपासून या दोघांमध्ये चाललेल्या संघर्षाचा फटका पूर्व राजस्थानमध्ये पक्षाला बसू शकतो. मागच्या आठवड्यात सवाई माधोपूरचे काँग्रेसचे आमदार आणि मुख्यमंत्री गहलोत यांचे सल्लागार दानिश अबरार यांना स्वतःच्याच मतदारसंघात लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. दानिश अबरार एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असता, पायलट समर्थकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “पायलट के गद्दारों को, गोली मारो….”, अशी घोषणाबाजी अबरार यांच्याविरोधात करण्यात आली.
दानिश अबरार गुरुवारी (२१ सप्टेंबर) मतदारसंघातील गुर्जर समाजाच्या भगवान देवनारायण मंदिराच्या वार्षिक उत्सवात सहभागी होण्यासाठी गेले होते. सचिन पायलट गुर्जर समाजातून येतात, भगवान देवनारायण मंदिर हे गुर्जर समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये दानिश अबरार मंचावर बसले असून त्यांच्यासमोरच पायलट समर्थक ‘दानिश मुर्दाबाद, पायलट जिंदाबाद’ अशा घोषणा देताना दिसत आहेत. आयोजकांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन करूनही कार्यकर्ते थांबायला तयार नव्हते.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गहलोत आणि पायलट यांच्या निष्ठावंतांमधील वाद मिटवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, तसेच सचिन पायलट यांनी गहलोत सरकारवर जाहीर टीका करणे थांबविल्यानंतरही दानिश अबरार यांच्याविरोधात पायलट समर्थकांनी आक्रमक घोषणाबाजी केल्यामुळे हे स्पष्ट होते की, दोन्ही गटातील मनभेद संपलेला नाही. पक्ष एकत्रितपणे आता निवडणुकीला सामोरे जात असतानाही दोन गटातील ही नाराजी पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकते.
दानिश अबरार यांच्यावर पायलट समर्थकांचा राग का?
दानिश अबरार यांच्या विरोधात पायलट समर्थकांच्या नाराजीचे कारण जुलै २०२० च्या पक्षांतर्गत बंडखोरीमध्ये सापडते. तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गहलोत यांच्याविरोधात बंडखोरी करत १८ आमदारांसह मानेसर, हरियाणा आणि दिल्ली येथे तब्बल एक महिना वास्तव्य केले होते. अबरार, चेतन दुडी आणि रोहित बोहरा हे तिघेही पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते आणि यांना पायलट यांच्या गटात गणले जात होते. मात्र पायलट यांच्या १८ आमदारांच्या गटात तिघेही नव्हते. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलट यांच्यासमवेत अनेक आमदार होते, मात्र मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी समजूत काढल्यानंतर अनेक आमदार दिल्लीहून गहलोत यांच्याकडे परतले होते. अबरार, दुडी आणि बोहरा हे तिघेही दिल्लीहून परतलेल्यांच्या यादीत असल्याचे बोलले जाते. गहलोत यांच्या निवासस्थानी त्यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत या तिघांनीही महिनाभर चाललेल्या बंडखोरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मान्य केले.
परत आलेल्या आमदारांनी सांगितले की, ते वैयक्तिक कारणांसाठी दिल्लीला गेले होते आणि ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहतील. तसेच पायलट यांना सुरुवातीला पाठिंबा दिल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी मागे फिरल्याच्या अफवांबद्दल या आमदारांनी माध्यमांना दोष दिला. तीनही आमदारांनी घडलेला घटनाक्रम सांगून स्वतःची चूक कबूल केली असली तरी गहलोत यांनी त्यांचे जाहीरपणे आभार मानलेले आहेत, त्यांनी मुख्यमंत्री गटाला मदत केली, असा यातून अर्थ काढला गेला. २०२१ साली अबरार यांना मुख्यमंत्री गहलोत यांचे सल्लागर म्हणून निवडण्यात आले. यावेळी गहलोत यांनी पुन्हा एकदा तीनही आमदारांचे आभार मानले. “या तिघांच्या निष्ठेबाबत पक्ष त्यांना कधीही विसरू शकत नाही. या तिघांनी वेळीच साथ दिली नसती, तर आज मी तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून उभा राहू शकलो नसतो”, अशी प्रतिक्रिया दिली.