काँग्रेस नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान, सोमवारपासून राजस्थान विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. राज्यपाल कलराज मिश्रा सकाळी ११ वाजता विधानसभेत अभिभाषण करतील. त्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी अशोक गेहलोत यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली. या बैठकीत गेहलोत यांनी सचिन पायलट यांचा उल्लेख “करोना व्हायरस” असा केल्याचा आरोप आहे. बैठकीदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना गेहलोत यांनी कोणाचंही नाव न घेता म्हटलं, “मी लोकांना भेटायला सुरुवात केली आहे… याआधी करोना आला होता… आता मोठा करोनाही आपल्या पक्षात शिरला.”
हेही वाचा- मेघालय निवडणुकीसाठी भाजपा राबवणार ‘हा’ पॅटर्न; काँग्रेससाठी ठरणार मोठे आव्हान
गेहलोत आणि पायलट यांच्यातील सत्तासंघर्षामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यांच्यातील वाद मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे. काही वेळा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सहकार्य केलं. मात्र, त्यांच्यातील वाद अद्याप सुरूच आहे.
हेही वाचा- रामचरितमानस दलितविरोधी आहे म्हणणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्याबाबत सपाचं मौन का?
सोमवारपासून सचिन पायलट यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन दैनंदिन जाहीर सभा घ्यायला सुरुवात केली आहे. या सभांमधून सचिन पायलट पेपर फुटणे, पक्ष कार्यकर्त्यांशी होणारा भेदभाव आणि निवृत्त नोकरशहांच्या राजकीय नियुक्त्या अशा मुद्द्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’नं राजस्थानमध्ये प्रवेश केल्यानंतर, गेहलोत आणि पायलट यांच्यातील सत्तासंघर्ष थोडासा कमी झाला होता. परंतु राहुल गांधींची पदयात्रा राजस्थानातून बाहेर जाताच दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा वादाला सुरुवात झाली. डिसेंबर २०१८ मध्ये राजस्थानात काँग्रेसने सरकार स्थापन केल्यापासून गेहलोत आणि पायलट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे.