राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज विधानभवनात अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी चूक केली. त्यांनी वर्षभरापूर्वीचाच अर्थसंकल्प सादर केला. सात ते दहा मिनिटं ते जुनाच अर्थसंकल्प वाचत होते. त्यानंतर आता अशोक गहलोत यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री २०२२-२३ या वर्षाचंच बजेट वाचत होते हे लक्षात येताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. आता या प्रकरणी अशोक गहलोत यांनी माफी मागितली आहे.
काय म्हटलं आहे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी?
अर्थसंकल्प लिक झालेला नाही. या वर्षीच्या अर्थसंकल्पासोबत एक पान मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या ठेवलं गेलं. ते कसं काय झालं याची चौकशी आम्ही करतो आहोत. मात्र माझ्याकडून जुना अर्थसंकल्प वाचला गेला याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाने मला सांगावं की कुठे बजेट लिक झालं? असं काहीही घडलेलं नाही असंही अशोक गहलोत यांनी म्हटलं आहे.
अशोक गहलोत यांनी आणखी काय म्हटलं आहे?
“भाजपाला फक्त हे दाखवायचं आहे की राजस्थानचा विकास आम्हाला नको. भाजपा स्वतःच विकास आणि प्रगतीच्या विरोधात आहे. बजेट लिक होण्याचा आरोप भाजपाकडून केला जातो आहे तो बिनबुडाचा आहे. भाजपा या सगळ्यातून गलिच्छ राजकारण करतं आहे.” असाही आरोप अशोक गहलोत यांनी केला आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत असंही गहलोत यांनी म्हटलं आहे.
वसुंधरा राजे यांनी काय म्हटलं आहे?
भाजपाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री अशोक गहलोत जर न तपासता बजेट वाचणार असतील तर त्यावरून हेच दिसतं की ते कशा प्रकारे राज्यकारभार करत आहेत. मुख्यमंत्री वाचणार आहेत त्या अर्थसंकल्पात जुन्या बजेटचं पान कसं येतं? असाही प्रश्न वसुंधरा राजे यांनी विचारला. अशोक गहलोत हे कुठल्या शुद्धीत असतात? अशा प्रकारे अर्थसंकल्प वाचणं गैर आहे अशोक गहलोत यांचं कुशासन कसं चाललं आहे तेच यावरून दिसतं आहे असंही त्या म्हणाल्या.