राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद सध्या दिल्लीमधील हायकमांडसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील कलह वाढतच चालला आहे. हे दोन्ही नेते प्रत्यक्ष-प्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. वसुंधरा राजे सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी पायलट करत आहेत. पायलट यांनी राजस्थानमधील पेपरफूट प्रकरणावरूनही गेहलोत यांच्यावर टीका केली आहे. याच कारणामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. फेपर फुटल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपाई द्या अशी मागणी करणे म्हणजे बौद्धिक दिवळखोरीचे लक्षण आहे, अशी टीका गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केली आहे.
हेही वाचा >> झोपडट्टीवासियांना अडीच लाखांमध्ये घर; निर्णयाचा राजकीय फायदा किती ?
अशोक गेहलोत नेमके काय म्हणाले?
अशोक गेहलोत यांनी जयपूर येथे एका सभेला संबोधित केले. या वेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर खरपूस शब्दांत टीका केली. त्यांनी पेपरफुटीवर बोलताना ‘विरोधक’ असा शब्द उच्चारला असला तरी त्यांचा रोख पायलट यांच्याकडे होता, असे म्हटले जात आहे. “गुजरातमध्ये १५ पेपर फुटले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये हा आकडा २२ आहे. देशात असे कोणते राज्य आहे, जेथे पेपर फुटलेले नाहीत. आम्ही मात्र याबाबत एक कायदा आणला. पेपरफुटीशी निगडित असलेल्या २०० लोकांना तुरुंगात टाकले. अशी कारवाई आतापर्यंत कोणत्या राज्याने केलेली आहे?” असे गेहलोत म्हणाले.
“सध्या विरोधकांकडे टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे ते पेपरफुटीवर बोलत आहेत. राज्यातील २६ लाख परीक्षार्थींना आर्थिक मदतीच्या स्वरुपात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ते करत आहेत. पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यापासून ही मागणी केली जात आहे. अशी मागणी करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे,” अशी टीकाही गेहलोत यांनी केली.
हेही वाचा >> संसदेची नवी इमारत ते कृषी कायदे, वैचारिक मतभेद असले तरी मोदींना घेरण्यासाठी विरोधक अनेकवेळा एकत्र!
सचिन पायलट यांनी काय मागणी केली आहे?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सचिन पायलट यांनी पाच दिवसीय जन संघर्ष यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेदरम्यान त्यांनी अशोक गेहलोत यांच्यावर टीका केली. तसेच राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आम्ही राज्यभरात आंदोलन करू, असा इशाराही पायलट यांनी गेहलोत यांना दिला. भ्रष्टाचारी राजस्थान लोकसेवा आयोग विसर्जित करावा. त्याचे पुनर्गठन करावे. तसेच आगामी काळात राजस्थान लोकसेवा आयोगाकडून भ्रष्टाचार होऊ नये यासाठी नवा कायदा करावा. पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीच्या स्वरुपात नुकसान भरपाई द्यावी. पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच वसुंधरा राजे सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याकडे केली आहे.