राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उदयपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुन्हेगारीवर भाष्य केलं आहे. बलात्कारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं मुंडण करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढावी, तेव्हाच हे बलात्कारी आहेत, हे सर्व जनतेला कळेल. तसेच यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल, असं विधान गेहलोत यांनी केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारची अग्निवीर योजना, पेपरफुटी आणि कर्जमाफीवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.
यावेळी गेहलोत म्हणाले की, कठोर कारवाई केल्यास इतर गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल. सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना हातकडी लावू नये, असे आदेश दिले आहेत. पण लोकांना हातकडी घातली तर त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, यामुळे गुन्हा करताना घाबरतील. न्यायव्यवस्था आपलं काम करते, आपण आपलं काम करायचं. न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था असते. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे, आपले कर्तव्य आहे, असंही गेहलोत म्हणाले.
गेहलोत यांची अग्निवीर योजनेवर जोरदार टीका
केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवर भाष्य करताना गेहलोत म्हणाले की, अग्निवीर योजनेवर सुरुवातीपासूनच बरीच टीका होत आहे. कोणाशीही चर्चा न करता केंद्र सरकारने अचानक ही योजना जाहीर केली. अग्निवीर योजनेविरोधात आंदोलन केल्यास आम्ही गुन्हा दाखल करू… यानंतर तुम्हाला आयुष्यभर नोकरी मिळणार नाही, अशी धमकी केंद्र सरकारकडून देण्यात आली. कारवाईच्या भीतीने लोक शांत झाले. अशा प्रकारे धमक्या देऊन लोकांना शांत करणे योग्य नाही, असे मला वाटते, असंही गेहलोत म्हणाले.