विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपाने भजनलाल शर्मा यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी भविष्यात अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेत दिले. सत्तेत येताच त्यांनी अशोक गेहलोत सरकारच्या काळातील पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले. राज्यात भ्रष्टाराला थारा दिला जाणार नाही. महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे भजनलाल शर्मा म्हणाले.
गुंडविरोधी टास्क फोर्सची स्थापना
गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुंडविरोधी टास्क फोर्सची स्थापना केली जाईल. तसेच शासकीय परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापप केले जाईल, अशी देखील घोषणा भजनलाल शर्मा यांनी केली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (१५ डिसेंबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी
केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी या योजनेवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी विशेष समितीची स्थापना केली जाईल, असेही भजनलाल शर्मा यांनी सांगितले. शर्मा हे पहिल्यांदाच निवडून आलेले असून त्यांची थेट मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आहेत.
पेपरफुटीमुळे राज्यातील तरुण निराश- शर्मा
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी गुन्हेगारी, महिला सुरक्षा, राज्याचा विकास तसेच भ्रष्टाचार अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. “आमचे सरकार महिलांवर अत्याचार झाल्यास ते कदापि सहन करणार नाही. महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचाराचा नायनाट याला आमच्या सरकारकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. याआधीच्या सरकाच्या काळात पेपरफुटी प्रकरण झालेले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. या पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यातील तरुण निराश झालेले आहेत,” असे शर्मा म्हणाले.
पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी विशेष पथक
“ज्यांनी ज्यांनी तरुणांच्या भविष्याशी खेळ केलेला आहे, अशा सर्वांनाच योग्य ती शिक्षा मिळेल. तसेच भविष्येत कोणत्याही परीक्षेत पेपरफुटी होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील. गेल्या सरकारच्या काळात झालेल्या पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले जाईल. या पथकाच्या स्थापनेला सुरुवातही झाली आहे,” असेही शर्मा यांनी सांगितले.
भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण नाही- शर्मा
राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष गुंडविरोधी टास्क फोर्सची स्थापना केली जाईल. या टास्क फोर्सचे नेतृत्व एडीजी स्तरीय अधिकाऱ्याकडे असेल. राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यात असलेली प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढले जातील. भ्रष्टाचार करण्याऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. राज्यात कोणताही गुन्हा घडू दिला जणार नाही. तसे झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सचिन पायलट यांच्यामुळे अशोक गेहलोत अडचणीत
दरम्यान, राजस्थान सरकारमध्ये झालेल्या पेपरफुटी प्रकरणामुळे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत चांगलेच अडचणीत आले होते. माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेते सचिन पायलट यांनी पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी करत स्वत:च्याच पक्षातील गेहलोत यांना अडचणीत आणले होते. आता राजस्थानमध्ये सत्ताबदल झाला आहे. नव्या सरकारने या पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.