राजस्थान विधानसभेत शुक्रवारी ७ मार्चला भाजपा आमदार गोपाल शर्मा आणि काँग्रेसचे मुख्य प्रतोद रफीक खान यांच्यात जोरदार वाद झाला. गोपाल शर्मा यांनी रफीक खान यांना वारंवार पाकिस्तानी म्हटल्याने त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. त्यावर खान यांनी शर्मा यांनी केलेल्या टीकेला हसत हसत उत्तर दिले, “उनका जो फर्ज है, वो अहल-सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहाँ तक पहुचें…” (राजकारणातील लोकांना त्यांचे कर्तव्य कळायला हवे, माझा प्रेमाचा संदेश जिथे पोहोचायला हवा तिथे पोहोचेल…”)
जयपूरमधील सिव्हिल लाइन्स विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपाल शर्मा हे नेहमीच वादग्रस्त विधाने करत असतात. त्यांनी यापूर्वीही काँग्रेसचे आमदार खान यांना अनेकदा लक्ष्य केले आहे.. या माध्यमातून गोपाल शर्मा यांनी त्यांचे सहकारी आणि हवा महलचे आमदार बालमुकुंद आचार्य यांच्याप्रमाणेच स्वतःची ओळख कट्टर धर्माभिमानी, अशी करू पाहत आहेत. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या विविध घडामोडींमध्ये खान यांनी त्यांच्या पक्षासाठी निभावलेल्या भूमिकांमुळे त्यांचं एकंदर राजकीय वजन वाढलं आहे.
खान यांना भाजपाकडून टोमणे ऐकायला लागण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. ऑगस्ट २०२० मध्ये खान यांनी केंद्र सरकारला धारेवर धरताना कोविड महामारीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागताची तयार करीत असल्याचा आरोप केला होता. त्यावर भाजपा आमदार त्यांना ‘तबलिगी’ म्हणाले होते. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी, भाजपा आमदारांना “या मुद्द्याला जातीय दृष्टिकोनापासून दूर ठेवा” असे सांगितले होते.
डिसेंबर २०२३ दरम्यान खान पुन्हा चर्चेत आले. आदर्श नगरमधील त्यांचे विरोधक रवी नय्यर यांनी खान यांच्यावर तीन गाईंना विषबाधा करून मारल्याचा आरोप केला होता.
मागच्या वर्षी जयपूर महापालिकेच्या हेरिटेज बैठकीतही या दोन नेत्यांमध्ये खडाजंगी झाली होती. या बैठकीदरम्यान शर्मा यांनी, “जयपूरला छोटा पाकिस्तान होऊ देणार नाही”, असे विधान केले होते. “खान हे जयपूरचे जिन्ना होऊ पाहत आहेत”, असेही शर्मा म्हणाले होते. तेव्हादेखील भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जोरदार वाद झाला होता.
या टीकांबाबत खान यांना विचारले असता ते म्हणाले, “हे नक्कीच दुखावणारं आहे; पण आम्ही त्यांच्याइतकी खालची पातळी गाठत नाही. म्हणून मी शर्मा यांच्या टोमण्यांना कवितेच्या भाषेत उत्तर दिलं. जसं आमचे नेते राहुल गांधी म्हणतात तसं, ‘नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान…’ “
या सर्व वादानंतर सोमवारी (१० मार्च) पत्रकारांशी बोलताना खान म्हणाले, “गेल्या दोन रात्री मी झोपू शकलेलो नाही. सभागृहात मला ज्या प्रकारे विचित्र वागणूक दिली गेली… बरं झालं माझे वडील आता जिवंत नाहीत, नाही तर ते हे सहन करू शकले नसते. मुस्लिम आमदार असणं हा काही गुन्हा आहे का? जर तसं असेल, तर विधानसभेत तसा कायदा आणावा आणि कोणतीही मुस्लिम व्यक्ती आमदार निवडून येऊ शकत नाही, असं भाजपानं सांगावं”.
२०१८ मध्ये राजस्थान भाजपाचे माजी प्रमुख अशोक परनामी यांचा पराभव करीत खान हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. अशोक गेहलोत यांच्या कारकिर्दीत खान हे तत्कालीन काँग्रेसचे प्रमुख प्रतोद महेश जोशी यांच्यासोबत काम करीत होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. २०२० मध्ये जेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरुद्ध बंड केलं तेव्हा खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एप्रिल २०२१ मध्ये आसाम विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले २० आमदार भाजपाहाती लागू नयेत, यासाठी त्यांची वेगळी सोय करण्याची जबाबदारीही खान यांनी व्यवस्थित पार पाडली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांची राजस्थान राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे त्यांना अल्पसंख्याकांना भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी आणखी वाव मिळाला.
उदयपूरमधील काँग्रेस आमदारांमध्ये फूट पडतेय की काय या भीतीने जून २०२२ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी क्रॉस-व्होटिंगच्या धसक्याने पक्ष पुन्हा खान यांच्याकडे वळला. तीन महिन्यांनी ते गेहलोत गटाचे प्रमुख सदस्य झाले होते. त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि पायलट यांना नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडण्याचा निर्णय उधळून लावला.
जुलै २०२३ मध्ये निलंबित मंत्री राजेंद्र गुढा आणि तत्कालीन संसदीय कामकाजमंत्री शांती धारीवाल या दोघांमध्ये विधानसभेत जोरदार हाणामारी झाली. त्यावेळी खान यांनीच प्रथम हस्तक्षेप केला होता.
त्याच वर्षीच्या अखेरीस पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत खान यांनी आपली जागा कायम ठेवली. त्यांनी भाजपाच्या नय्यर यांचा पराभव केला. खान यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची मालमत्ता ५० कोटींपेक्षा जास्त होती आणि ३० कोटी रुपयांचे दायित्व त्यांनी घोषित केले होते.
गेल्या वर्षी जुलैमध्ये खान यांची काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली. सीआरपीएफमधून निवृत्त झालेले अधिकारी विकास जाखर यांनी खान यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा ते चर्चेत आले.. या घटनेने सोशल मीडियावर जाट विरुद्ध मुस्लिम असं चित्र पाहायला मिळालं . “लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी असलेल्या दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा”, असे काही काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते.
मागच्याच आठवड्यात आदर्श नगरच्या या आमदाराने रायजिंग राजस्थान इन्व्हेस्टमेंट समिटची माहिती मागविण्याबाबत प्रश्न विचारले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी हे प्रश्न काल्पनिक आणि खूपच मोठे असल्याचे सांगत फेटाळून लावले.
अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांवर बोलताना बिगरमुस्लिम घटकांना ते वेगळे करण्याचा धोका पत्करू शकतात का, असे विचारल्यावर “काँग्रेस नेता हा सर्व समुदायांचा नेता असतो”, असे उत्तर खान यांनी दिले.
राज्यात मुस्लिम नेतृत्वाच्या बाबतीत राजकीय पोकळी निर्माण होऊ शकते. ती भरून काढण्याचा एआयएमआयएमने अयशस्वी प्रयत्न केला. जयपूरमधून दोन मुस्लिम आमदार निवडून आले. खान यांच्यानंतर अमीन काग्झी यांच्या विजयानंतर सुमारे ३० मुस्लिम नगरसेवक जेएमसी हेरिटेजमध्ये निवडून आले आहेत.
दरम्यान, खान यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. कारण- अलीकडेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ‘आपकी दादी’ असे संबोधणाऱ्या एक मंत्र्यावर काँग्रेसने आक्षेप घेत जवळपास आठवडाभर गदारोळ केला. मात्र, दुसरीकडे त्यांच्या एका मुस्लिम नेत्याला ‘पाकिस्तानी’ म्हटल्यावर काँग्रेस नेते फारसा आक्रोश करताना दिसले नाहीत.