काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सचिन पायलट यांनी स्वत:च्या सरकारविरोधातच दंड थोपटल्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये सध्या अस्थितरता निर्माण झाली आहे. भाजपा तथा वसुंधराराजे सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या मागणीला घेऊन त्यांनी अशोक गेहलोत सरकारविरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणही केले आहे. असे असतानाच त्यांनी पुन्हा एकदा वसुंधराराजे सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच मी उपोषण करून आठवडा उलटला तरीही सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असे म्हणत गेहलोत सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन पायलट यांनी रविवारी अशोक गेहलोत सरकारवर गंभीर आरोप केले. वसुंधराराजे सरकारमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत सरकार निष्क्रियता दाखवीत आहे. “माझ्या उपोषणाला आठवडा झालेला आहे, तरीदेखील सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. जेव्हा पक्षाने लोकांकडे मते मागितली तेव्हा काही लोकांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. हीच आश्वासने पूर्ण करायला हवीत,” असे सचिन पायलट म्हणाले. ते खेत्री येथील झुनझुनू येथे सभेला संबोधित करीत होते.

हेही वाचा >>> अ‍ॅपलच्या भारतातील पहिल्या स्टोअरचे उद्घाटन, खुद्द CEO टीम कुक यांनी लावली हजेरी; जाणून घ्या मुंबईतील स्टोअरची विशेषत: काय?

प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारणासाठी आजही संघर्ष करावा लागतोय. हा संघर्ष कालही होता, भविष्यातही तो कायम राहील. मी जो लढा लढतोय तो योग्य आहे की नाही, असा सवालही त्यांनी जनतेला केला. पुढे बोलताना त्यांनी अशोक गेहलोत यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. “मी माझे शब्द जपूनच वापरतो. मी काहीही बरळत नाही. कारण माझ्यावर तसे संस्कार झालेले आहेत. माझ्यावर लहानपणापासूनच सभ्यता, शालीनतेचे संस्कार झालेले आहेत. मी वयाने मोठ्या लोकांचा कायम सन्मान केलेला आहे,” असे सचिन पायलट म्हणाले. याआधी अशोक गेहलोत सचिन पायलट यांना बिनकामाचा आणि निष्प्रभ म्हणाले होते. याचाच संदर्भ देत पायलट यांनी वरील विधान केले. पत्रकारांशी बोलतानाही सचिन पायलट यांनी वसुंधराराजे सरकारमधील कथित भ्रष्टाचाराचा पुनरुच्चार केला. वसुंधराराजे सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी झालेली नाही. याबाबत काही तरी निर्णय होणे गरजेचे आहे, असे पायलट म्हणाले.

हेही वाचा >>> विश्लेषण: आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण कशामुळे झाली?

काँग्रेस पक्षाकडून राजस्थानमध्ये प्रत्येक आमदारासोबत बैठक घेतली जात आहे. मात्र या बैठकीला सचिन पायलट अनुपस्थित राहिले. माझा अगोदरपासून कार्यक्रम निश्चित झालेला होता, त्यामुळे मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असे स्पष्टीकरण पायलट यांनी दिले. काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा माजी आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी सचिन पायलट यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. ‘ भ्रष्टाचार हा मोठा आणि गंभीर मुद्दा आहे. सचिन पायलट यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबत काही तरी कारवाई होणे गरजेचे आहे,’ असे शर्मा म्हणाले.

काँग्रेसकडून सत्ताविरोधी लाटेची चाचपणी!

काँग्रेस पक्षाकडून सत्ताविरोधी लाटेची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी काँग्रेस त्यांच्या प्रत्येक आमदारासोबत बातचीत करीत आहे. सोमवारपासून या बैठकीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदरसिंग रंधावा, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह दोतसरा आदी नेत्यांनी अजमेर आणि जोधपूर विभागातील दहा जिल्ह्यांमधील आमदारांशी चर्चा केली. उर्वरित आमदारांशी मंगळवारी, बुधवारी चर्चा केली जाणार आहे.

हेही वाचा >>> करोना महामारीनंतर Plant Pandemic ची जगाला चिंता; बांगलादेशचा गहू उद्ध्वस्त करणाऱ्या रोगाचा भारताला धोका किती?

या चर्चेदरम्यान आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील परिस्थितीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आमदारांना एक प्रश्नावली देण्यात येत आहे. या प्रश्नावलीत एकूण १३ प्रश्न आहेत. मात्र काँग्रेसची ही मोहीम म्हणजे फक्त औपचारिकता आहे, असे काही आमदारांना वाटत आहे. “सध्या काही आमदारांच्या बाबतीत लोकांमध्ये नकारात्मकता पसरलेली आहे. मात्र आमदारांशी सध्या जी चर्चा केली जात आहे, ती एक औपचारिकताच आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही काही तरी करीत आहोत, असे पक्षाला दाखवायचे आहे,” असे एका काँग्रेसच्या आमदाराने म्हटले आहे.

काँग्रेसतर्फे येत्या २४ एप्रिल रोजी ‘महंगाई राहत’ शिबिराचे आयोजन केले जात आहे. या शिबिरासाठी जास्तीत जास्त लोकांना घेऊन येण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.

हेही वाचा >>> केरळमध्ये पेट्रोल टाकून प्रवाशांना जाळले, आरोपी म्हणतो मला झाकीर नाईककडून प्रेरणा; फरार झालेला कथित इस्लामिक धर्मगुरू कोण आहे?

आमदारांना प्रश्नावलीत कोणते प्रश्न विचारण्यात येत आहेत?

  • तुमच्या मतदारसंघात जात आणि धार्मिक समीकरण कसे आहे?
  • तुमचे तुमच्या मतदारसंघात काय स्थान आहे? तुम्ही स्वत:ला १० पैकी किती गुण द्याल?
  • तुमच्या मतदारसंघात कोणत्या पाच योजना प्रभावीपणे राबवण्यात आलेल्या आहेत?
  • नवीन जिल्हानिर्मितीसंदर्भात तुमचे मत काय आहे?
  • ईआरसीपी प्रकल्पासंदर्भात तुमचे काय मत आहे. (१३ जिल्ह्यांतील आमदारांना हा प्रश्न विचारण्यात येत आहे.)
  • तुमच्या मतदारसंघात आणखी एखादी राजकीय शक्ती आहे का? या शक्तीच्या स्थानाबाबत तुमचे काय मत आहे?
  • तुमच्या विरोधातील लाट थोपवण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे?
  • तुमच्या समाजमाध्यम खात्यांची काय स्थिती आहे?
  • -तुमचे समाजमाध्यम खाते तुम्ही स्वत: सांभाळता का? दुसरी व्यक्ती, संस्था हे खाते सांभाळत असेल तर त्याचा तपशील द्यावा.
  • ‘महंगाई राहत’ शिबिराला यशस्वी करण्यासाठी तुम्ही काय नियोजन केले आहे?
  • सध्या राज्यात लोकांमध्ये सत्ताविरोधी भावना कशी आहे? सत्ताविरोधी भावनेला थोपवण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे?
  • निवडणुकीविषयी लोकांच्या मनात काय भावना आहे? तुम्हाला काय वाटते?
  • तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या आहेत का?
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan congress sachin pilot and ashok gehlot clash prd