राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी स्वत:च्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर, म्हणजेच अशोक गेहलोत यांच्यावर, गंभीर आरोप केले आहेत. वसुंधराराजे सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास गेहलोत सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप पायलट यांनी केला आहे. विशेष म्हणजे वसुंधराराजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी एका दिवसाचे लक्षणिक उपोषणही केले होते. तरीदेखील गेहलोत सरकारने अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. दरम्यान, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या लढाईत आता वसुंधराराजे यांनी उडी घेतली आहे.
हेही वाचा >>> ग्रामीण भागात पर्याय निर्माण करण्यावर चंद्रशेखर राव यांचा भर
अशोक गेहलोत-वसुंधराराजे यांच्यात संगनमत?
अशोक गेहलोत आणि वसुंधराराजे हे दोघे वेगवेगळ्या पक्षांतील नेते आहेत. ते एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. मात्र गेहलोत आणि वसुंधराराजे यांच्यात संगनमत असल्याचा आरोप केला जातो. अलीकडेच राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल यांनी असा आरोप केला आहे. मागील दोन दशकांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये संगनमत आहे, असे बेनिवाल म्हणाले आहेत.
पायलट यांच्या आरोपांमुळे वेगवेगळे तर्कवितर्क
१९९८ सालापासून गेहलोत आणि वसुंधराराजे यांनी राजस्थानवर आलटून-पालटून राज्य केलेले आहे. मात्र अशा कोणत्याही संगनमताचे आरोप या दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी फेटाळून लावलेले आहेत. अशोक गेहलोत यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांनी वसुंधराराजे यांच्या सरकारच्या काळातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे गेहलोत-वसुंधराराजे यांच्यातील छुप्या संगनमताची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. वसुंधराराजे सरकारच्या काळातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मला चिंता वाटत आहे. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात निर्णायक कृती करण्याची गरज आहे, असे पायलट म्हणाले होते.
हेही वाचा >>> नगरमध्ये बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये विखे-पाटील आणि थोरात आमनेसामने
आमची विचारधारा वेगळी, संगनमत असण्याचा प्रश्नच नाही- वसुंधराराजे
सचिन पायलट यांच्या आरोपानंतर आता वसुंधराराजे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले आहेत. “असत्य हे क्षणिक असते, सत्य मात्र अमर असते. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत लवकरच सत्य बाहेर येईल. काही लोक माझ्या बाबतीत असत्य गोष्टींचा प्रचार करत आहेत. आमच्यात (गेहलोत-वसुंधराराजे) संगनमत झालेले आहे, असा आरोप केला जात आहे. मात्र आमचे विचार वेगळे आहेत. आमची विचारधारादेखील वेगळी आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. अशा अफवा पसरविण्याआधी विचार करायला हवा,” असे वसुंधराराजे म्हणाल्या.
वसुंधराराजे यांची पायलट यांच्यावर खोचक शब्दांत टीका
त्यांनी आपल्या संपूर्ण भाषणात सचिन पायलट यांचा उल्लेख केला नाही. मात्र त्यांचा रोख पायलट यांच्याकडेच होता. “जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात नवे असतो, तेव्हा आपल्यात अहंकार असतो. पुढे आपण जसे मोठे होतो, आपल्याला जसजसा अनुभव येतो तसतसे आपल्याला सर्वकाही समजायला लागते. बहुतांश नवख्या राजकारण्यांच्या बाबतीतही असेच घडते. असे लोक आपल्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या लोकांशी चांगले वागत नाहीत आणि वरिष्ठ लोकांचाही आदर करत नाहीत,” असे वसुंधराराजे सचिन पायलट यांना उद्देशून म्हणाल्या.
हेही वाचा >>> Karnataka Election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेनेच्या उमेदवारीने विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम
वसुंधराराजे यांच्या टीकेला पायलट यांनी दिले उत्तर
वसुंधरा राजे यांच्या या टीकेला सचिन पायलट यांनीदेखील जशास तसे उत्तर दिले आहे. “मी वसुंधराराजे यांचे विधान ऐकले. वसुंधराराजे आणि अशोक गेहलोत यांच्यात संगनमत आहे, असे मी कधीही म्हणालेलो नाही. मग याबाबत स्पष्टीकरण का दिले जात आहे? आम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि सरकार यावर कारवाई करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. दोन आठवडे उलटले असले तरी काँग्रेस पक्ष आणि आमचे सरकार यावर नक्की कारवाई करेल, असे मला वाटते. सध्या वेळ खूप कमी आहे, त्यामुळे कारवाई करण्याची वेळ आली आहे,” असे सचिन पायलट म्हणाले.
हेही वाचा >>> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अतिक अहमदचा मुद्दा; भाजपाची अखिलेश यादव यांच्यावर टीका, शेअर केला व्हिडीओ!
दरम्यान, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे नेते बेनिवाल यांनी मागील वर्षी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला होता. त्या वेळीदेखील त्यांनी, वसुंधराराजे आणि अशोक गेहलोत यांचे राजकीय संगमनत आहे. वसुंधराराजे यांनी अशोक गेहलोत यांना २०२० च्या राजकीय संकटात मदत केली होती, असा आरोप केला होता. २०२० साली पक्षातीलच नेत्यांनी गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारले होते.