राजस्थान काँग्रेसधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. काँग्रेसचे बडे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी स्वत:च्या सरकारविरोधात उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. वसुंधरा राजे सरकारमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी पायलट यांनी केली आहे. पायलट यांच्या या भूमिकेमुळे अशोक गेहलोत सरकार अडचणीत आले आहे. पर्यायाने काँग्रेसचीही चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसची ही अडचण ओळखून विरोधकांनी सचिन पायलट यांच्या या भूमिकेचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. एमआयएम तसेच आप अर्थात आम आदमी पार्टीने पायलट यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर भाजपाने हा काँग्रेसचा शेवट असल्याचे म्हटले आहे.
वरिष्ठांना धुडकावून पायलट यांचे उपोषण
वसुंधरा राजे सरकारमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचारावर अशोक गेहलोत सरकारने कारवाई करावी, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली आहे. यासह जनतेच्या मनात काँग्रेसच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मी आंदोलन करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर काँग्रेस हायकमांडने त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा सल्ला धुडकावून सचिन पायलट यांनी उपोषण केले.
हेही वाचा >>> राहुल गांधींचे ‘अनिष्ट’ व्यवसाय करणाऱ्यांशी संबंध; आझाद यांच्या आरोपानंतर ते अनिष्ट व्यवसाय उघड करण्याची मागणी
हा तर काँग्रेसचा शेवट- भाजपा
सचिन पायलट यांच्या या भूमिकेवर भाजपाने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाचे नेते राजेंद्र राठोड यांनी हा काँग्रेसचा अस्त आहे, असा दावा केला आहे. “सचिन पायलट हे स्वत:च्या पक्षातील सर्वोच्च नेत्याला आव्हान देत आहेत. सचिन पायलट यांनी एका दिवसाचे उपोषण केले. हे काँग्रेसच्या अस्ताचे निदर्शन आहे. काँग्रेस पक्षाने देशभरात आपली पकड गमावली आहे,” असे राठोड म्हणाले आहेत.
एमआयएमकडून पायलट यांच्या भूमिकेचे स्वागत
एमआयएम पक्षाने सचिन पायलट यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. पायलट यांच्या उपोषणावर एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केले आहे. “याआधीचे भाजपाचे आणि सध्याचे काँग्रेस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याच कारणामुळे माजी उपमुख्यमंत्र्यांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. सचिन पायलट यांच्या आंदोलनातून काय संदेश गेला आहे? काँग्रेस आणि भाजपा भ्रष्टाचाबाबत गंभीर नाहीत, हाच संदेश यातून गेला आहे,” असे ओवैसी म्हणाले आहेत.
हेही वाचा >>>मुख्यमंत्रीपदासाठी खरगेंचा आग्रह आणि शिवकुमारांची तिरकस खेळी
राजस्थानला अन्य पर्यायाची गरज आहे- आम आदमी पार्टी
आम आदमी पार्टी राजस्थान विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. सचिन पायलट यांच्या उपोषणावर आम आदमी पार्टीचे नेते तथा आप राजस्थानचे निवडणूक प्रभारी विनय मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एका उच्चशिक्षित आणि तरुण नेत्याला भ्रष्टाचाराविरोधात उपोषण करावे लागत आहे. राजस्थानला अन्य पर्यायाची गरज आहे,” असे मिश्रा म्हणाले आहेत. त्यांनी अशोक गेहलोत सरकारवरही टीका केली आहे.