आगामी काही महिन्यांत राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. या निवडणुकीनंतर लगेच लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक लढण्यास मिळणारी संधी लक्षात घेता येथील नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. नुकतेच माजी खासदार तथा काँग्रेसच्या नेत्या ज्योती मिर्धा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मिर्धा यांच्या भाजपा प्रवेशामुळे नागपूर या प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
मिर्धा यांचा भाजपाप्रवेश हा काँग्रेससाठी अडचणीचा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण त्यांचे नागपूर प्रदेशात मोठे राजकीय प्रस्थ होते. मात्र त्यांनी आज (११ सप्टेंबर) दिल्लीमध्ये भाजपाचे राजस्थान राज्याचे प्रभारी अर्जुन सिंह आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मिर्धा यांच्या येण्याने भाजपाला नागपूर तसेच उर्वरित राजस्थानमध्ये बळ मिळेल, मिर्धा यांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, अशी भाजपाला अपेक्षा आहे.
मिर्धा यांचे कुटुंबीय राजकारणात सक्रिय
ज्योती मिर्धा या जाट समाजातून येतात. तसेच त्या मोठा राजकीय वारसा असलेल्या मिर्धा घराण्यातील आहेत. हे घराणे स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकारणात सक्रिय आहे. मिर्धा यांचे आजोबा हे राजस्थानच्या पहिल्या विधानसभेचे सदस्य होते. याच घराण्याशी निगडीत दुसरे नाव बलदेव राम मिर्धा असे आहे. बलदेव यांचे पुत्र रामनिवास मिर्धा हेदेखील राजस्थानच्या पहिल्या विधानसभेचे सदस्य होते. रामनिवास यांचे पुत्र हरेंद्र मिर्धा हे आमदार तसेच मंत्री राहिलेले आहेत. हरेंद्र मिर्धा यांचे पुत्र रघुवेंद्र मिर्धा हेदेखील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.
मिर्धा यांची राजकीय कारकीर्द
२००९ साली ज्योती मिर्धा यांनी नागपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ५४.६४ टक्के मते मिळवून विजय नोंदवला होता. त्यांनी या निवडणुकीत भाजपाचे नेते बिंदू चौधरी यांना पराभूत केले होते. चौधरी यांना २९.२१ टक्के मते मिळाली होती. पाच वर्षांनंतर २०१४ साली मोदी लाटेत ज्योती यांचा पराभव झाला. त्यांना भाजपाचे नेते सीआर. चौधरी यांनी पराभूत केले. या निवडणुकीत मिर्धा यांना ३३.७ टक्के तर सीआर चौधरी यांना ४१.२५ टक्के मते मिळाली होती. २०१९ सालच्या निवडणुकीतही मिर्धा यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांना राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे उमेदवार हनुमान बेनिवाल यांनी पराभूत केले होते. बेनिवाल हे भाजपाप्रणित एनडीएचे संयुक्त उमेदवार होते. या निवडणुकीत ज्योती यांना ३९.७४ टक्के तर बेनिवाल यांना ५४.७९ टक्के मते मिळाली होती.
…तर मिर्धा, बेनिवाल पुन्हा आमनेसामने?
बेनिवाल हेदेखील जाट समुदायातून येतात. ते एनडीएचे संयुक्त उमेदवार म्हणून निवडणू आले असले तरी २०२०-२०२१ साली कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी स्वत:ला भाजपापासून दूर केले. सध्या त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढली आहे. तर ज्योती यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे भविष्यात बेनिवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास ज्योती मिर्धा आणि बेनिवाल यांच्यात लढत पाहायला मिळू शकते.
“गेल्या चार वर्षांपासून मिर्धा पक्षात सक्रिय नव्हत्या”
दरम्यान, ज्योती मिर्धा यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते स्वर्णीम चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून ज्योती मिर्धा या पक्षात सक्रिय नव्हत्या. त्या नागपूर प्रांतातही सक्रिय नव्हत्या. त्यांनी काँग्रेसच्या कार्यक्रमांनाही हजर राहणे बंद केल होते. त्या बहुतांश वेळा राजस्थानच्या बाहेर असायच्या. त्या कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात. त्यांना मोकळीक आहे. त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला तरी नागपूर प्रांतातील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस पक्षाशीच जोडलेले आहेत. कारण ज्योती मिर्धा यांची ओळख ही पक्षामुळेच होती” असे चतुर्वेदी म्हणाले.