काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. देशातील स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्यही धोक्यात आले आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या याच विधानांवर भाजपाने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. राहुल गांधी विदेशात जाऊन स्वत:च्या देशाची नाचक्की करत आहेत. त्यांना युरोप आणि अमेरिकेचा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप हवा आहे, अशी टीका भाजपाने केली आहे. दरम्यान, राजस्थान काँग्रेसमधील एका नेत्याच्या मुलानेच राहुल गांधींच्या विधानांवर आक्षेप व्यक्त केला आहे.
हेही वाचा >> ‘भारतातील लोकशाही धोक्यात,’ राहुल गांधींचे लंडनमध्ये विधान; भाजपाची सडकून टीका
कोणी स्वत:च्या देशाचा अपमान करतो का?
राजस्थानचे पर्यटनमंत्री तथा काँग्रेसचे नेते विश्वेंद्र सिंह यांचे पुत्र अनिरुद्ध सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या ‘संसदेत लोकप्रतिनिधी बोलताना माईक बंद केला जातो,’ याच विधानावर अनिरुद्ध यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. “दुसऱ्या देशात असताना कोणी स्वत:च्या देशाचा अपमान करतो का? राहुल गांधी स्वत:ला कदाचित इटलीचे समजत असतील, त्यामुळे त्यांनी तसे विधान केले असावे,” असे अनिरुद्ध ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.
हेही वाचा >> बिहारी कामगारांवर हल्ल्याच्या अफवेनंतर डीएमके नेते बालू यांनी घेतली नितीश कुमारांची भेट; भाजपाविरोधी आघाडीवर चर्चा?
राहुल गांधी भारतात येऊन बोलू शकत नाहीत का?
लंडनमध्येच एका कार्यक्रमात बोलताना, भाजपा अनंत काळासाठी सत्तेत राहणार नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. याबाबतचे वृत्त ट्वीट करत अनिरुद्ध यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. “राहुल गांधी भारतात येऊन अशी वायफळ विधाने करू शकत नाहीत का? की राहुल गांधी युरोपीयन आहेत?” असे सवाल अनिरुद्ध यांनी केले होते.
हेही वाचा >> अमेरिकेतील भेदभावविरोधी कायद्याला विरोध, रा.स्व. संघाच्या ‘पांचजन्य’मध्ये ‘हिंदूफोबियाचा’ आरोप
विश्वेंदर सिंह सचिन पायलट यांच्या गटातील
अनिरुद्ध यांचे वडील विश्वेंदर सिंह राजस्थानमधील प्रतिष्ठित नेते आहेत. ते सचिन पायलट गटातील मानले जातात. त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधातील बंडामध्ये पायलट यांना साथ दिली होती. काँग्रेस बंडखोराच्या प्रचारासाठी रॅली काढल्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले होते. कालांतराने विश्वेंदर यांना पुन्हा एकदा मंत्रिपद देण्यात आले. मात्र त्यानंतर ते सचिन पायलट गटाच्या जवळ गेले.