Rajasthan Political News : भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी झालावाड जिल्ह्यातील पाणीप्रश्नावरून सरकारी अधिकाऱ्यांना फटकारलं. विरोधात असलेल्या काँग्रेसने याच संधीचा फायदा घेऊन भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला लक्ष्य केलं. एप्रिलच्या सुरुवातीलाच राजस्थानला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. अनेक जिल्हे तहानलेले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीप्रश्नावरून राजस्थानचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे.

दोनवेळा राजस्थानचं मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या वसुंधरा राजे यांनी मंगळवारी (तारीख ८ एप्रिल) झालावाड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी रायपूर शहराला भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणीप्रश्नावरून माजी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही, असं भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं.

वसुंधरा राजेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

मंगळवारी रात्री वसुंधरा राजे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. “फक्त अधिकारीच तहानलेले असतात का? जनता तहानलेली नसते का? उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे जनता हैराण झाली आहे आणि अधिकारी मात्र समाधानी आहेत. पाणी फक्त कागदावर नाही तर लोकांच्या कोरड्या घशापर्यंत पोहोचायला हवं. जनता रडतेय आणि अधिकारी झोपलेत, मी हे होऊ देणार नाही,” असं माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.

आणखी वाचा : Modi vs Gandhi : देशावर आर्थिक संकट येतंय, कुठं गेली ५६ इंचाची छाती? राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

“पंतप्रधानांनी जल जीवन मिशनसाठी ४२ हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. तुम्हाला प्रत्येक पैशांचा हिशेब द्यावा लागेल. झालावाडच्या वाट्याचे पैसे कुठे गेले, तुम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या? आमचं सरकार पिण्याच्या पाण्याच्या संकटावर उपाय करण्यासाठी पैसा देत आहे, पण अधिकारी योजनांची अंमलबजावणी नीट करत नाहीत, म्हणूनच राजस्थानची जनता तहानलेली आहे. एप्रिलमध्ये अशी परिस्थिती आहे, तर जून-जुलैमध्ये काय होईल?” असे प्रश्नही वसुंधरा राजे यांनी उपस्थित केले.

‘पाणीप्रश्नावर समाधानकारक उत्तर नाही’

“उपअभियंतापासून ते अधीक्षक अभियंतापर्यंत, कोणत्याही अधिकाऱ्याने पाणीप्रश्नावर मला समाधानकारक उत्तर दिले नाही. झालावाडमध्ये हे चालणार नाही, जनतेच्या संयमाची परीक्षा घेऊ नका”, असा संतापही माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारतानाचा फोटोही शेअर केला. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (PHE) विभागाचे अधीक्षक अभियंता दीपक झा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

काँग्रेसनं केलं भाजपा सरकारला लक्ष्य

वसुंधरा राजे यांनी पाणीप्रश्नावरून आपल्याच सरकारमधील अधिकाऱ्यांचे कान टोचले. काँग्रेसने याच संधीचा फायदा घेऊन भाजपा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “निष्क्रिय भाजपा सरकारच्या कथित विकासकामांचं सत्य राजस्थानच्या जनतेसमोर मांडल्याप्रकरणी आम्ही वसुंधरा राजे यांचे आभारी आहोत,” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी दिली. माजी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टचा दाखला देत गोविंदसिंह म्हणाले, “भजनलाल सरकारचं अपयश दाखवणारी ही पोस्ट कोणत्याही विरोधीपक्षाची नाही, तर खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंची आहे.”

विधानसभेचे विरोधीपक्षनेते टीकाराम जुली यांनीही या प्रकरणावरून भाजपाला लक्ष्य केलं. “भजनलाल सरकारचं वास्तव उघड करण्यासाठी राजे यांचे शब्द पुरेसे आहेत. राज्यात आपल्याच पक्षाचं सरकार असतानाही एका माजी मुख्यमंत्र्याला जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागतो, ही दुर्देवी बाब आहे, असं टीकाराम यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावास, ममता भूपेश, अशोक चांदना यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांनीही वसुंधरा राजे यांच्या विधानाचा आधार घेत भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपा नेते काय म्हणाले?

राजस्थानमधील झालावाड जिल्हा वसुंधरा राजेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्या पाचवेळा येथून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, तर याच जिल्ह्यातून पाचव्यांदा आमदारही झाल्या आहेत. त्यांचे पुत्र दुष्यंत राजे २००४ पासून झालावाडचे खासदार आहेत. दरम्यान, वसुंधरा राजे यांनी जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावरून सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी या प्रकरणाची माहिती मागवली आहे. “झालावाडमधील पाण्याच्या संकटाबाबत वसुंधरा राजेंनी व्यक्त केलेली चिंता जलशक्ती मंत्रालयाने गांभीर्याने घेतली आहे. या संदर्भात राजस्थान सरकारकडून तत्काळ वस्तुनिष्ठ अहवाल मागवण्यात आला आहे,” असं पाटील यांनी सांगितलं आहे.

यावर्षी जानेवारीमध्ये वसुंधरा राजेंनी जोधपूरचा दौरा केला होता, तेव्हा त्यांच्या आई विजयाराजे सिंदिया यांच्या पुतळ्याची दुर्दशा पाहून त्या स्थानिक अधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापल्या होत्या. डिसेंबर २०२३ मध्ये राजस्थानमध्ये पुन्हा भाजपाचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रिपदी आपलीच वर्णी लागणार अशी आशा वसुंधरा राजे यांना होती. मात्र, पक्षाने भजनलाल शर्मा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली, तेव्हापासून वसुंधरा राजे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी अनेकदा भाजपाच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

आणखी वाचा : Amit Shah : नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील का? अमित शाह काय म्हणाले?

‘निष्ठेचा तो काळ वेगळा होता’

जून २०२४ मध्ये उदयपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना वसुंधरा राजे यांनी माजी आरएसएस नेता आणि खासदार दिवंगत सुंदर सिंग भंडारी यांचा उल्लेख केला होता. “भंडारी यांनी अनेकांची राजकीय कारकीर्द घडवली, पण निष्ठेचा तो काळ वेगळा होता. आजकाल लोक ज्या बोटाला धरून चालायला शिकले, त्याच बोटाला कापण्याचा प्रयत्न करतात,” असं माजी मुख्यमंत्री म्हणाल्या होत्या. ऑगस्ट २०२४ मध्ये मदन राठोड यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, त्यावेळी जयपूरमधील भाजपा मुख्यालयात वसुंधरा राजेंनी केलेल्या भाषणाने अनेकांचं लक्ष वेधलं होतं.

‘…तर तुमची प्रतिष्ठा आपोआप कमी होते’

राजकारणात चढ-उतार सुरूच असतात, पण प्रत्येक व्यक्तीने पद, अभिमान आणि प्रतिष्ठा या तीन गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करायला हवं. पद आणि अभिमान कायमस्वरूपी नसतात, पण प्रतिष्ठा कायमस्वरूपी असते, जी तुमच्या चांगल्या कामामुळे तयार होते. लोक तुम्हाला तुमच्या कामाने आठवतात. तुम्हाला जर तुमच्या पदाचा अभिमान वाटला, तर तुमची प्रतिष्ठा आपोआप कमी होते,” असं वसुंधरा राजे म्हणाल्या होत्या. त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री शर्मा यांच्यासह राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्याच महिन्यात, वसुंधरा राजे यांनी अजून एक विधान केलं होतं.

‘तुम्ही जे पेरतात तेच उगवतं’

“जे लोक इतरांना दुखवतात आणि मानसिक यातना देतात, ते काही काळ आनंदी असू शकतात, पण शेवटी त्यांना त्याच मार्गावर जावं लागेल, ज्यावर त्यांनी इतरांना घेऊन जाऊन त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जे पेरतात तेच उगवतं”, असं माजी मुख्यमंत्री म्हणाल्या होत्या. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एका निवेदनात वसुंधरा राजे म्हणाल्या होत्या की, तुम्ही हरल्यानंतरही जिंकू शकता. महाराणा प्रताप यांनी आपल्याला हेच शिकवले आहे. महाराणांचे जीवन तत्वज्ञान असे म्हणते की, तुम्ही सापावर कितीही प्रेम करा, तो त्याच्या स्वभावानुसारच वागेल आणि तुम्हाला चावेल.

वसुंधरा राजेंमुळे भाजपा सरकार अडचणीत?

दरम्यान, राजस्थानमधील विविध प्रलंबित प्रश्नांवरून भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी झालावाडच्या पाणीप्रश्नावरून कथितपणे आपल्याच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणखी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे भाजपा सरकारला सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.