चालू वर्षाच्या शेवटी राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असून मुख्यमंत्रिपदी अशोक गहलोत हे आहेत. त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. केंद्रातील बडे नेते सातत्याने राजस्थानला भेट देत असून सभांच्या माध्यमातून काँग्रेस सरकारवर टीका करत आहेत. मात्र भाजपाकडून या निवडणुकीची कसून तयारी केली जात असली तरी भाजपाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सध्या चर्चेच्या विषय आहेत. त्यांना भाजपात डावललं जात असल्याची चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदींनी वसुंधरा राजेंचे नाव घेणे टाळले

गेल्या अनेक महिन्यांपासून वसुंधरा राजे यांना भाजपात डावलले जात आहे. भाजपा येणारी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करताच लढवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जयपूर येथे एका सभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी तसे संकेत दिले आहेत. “मला भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की आपली एकच ओळख आहे, ती म्हणजे कमळाचे चिन्ह,” असे मोदी म्हणाले. या कार्यक्रमात वसुंधरा राजे यादेखील उपस्थित होत्या. मात्र त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. तसेच आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात मोदी यांनी वसुंधरा राजे यांच्या सरकारचा उल्लेखही केला नाही.

सध्यातरी राजस्थानमध्ये मोदी हाच चेहरा

भाजपा राजस्थानमध्ये कर्नाटकप्रमाणेच रणनीती आखण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा समोर ठेवून भाजपाने ही निवडणूक लढवली होती. कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा यासारख्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांना तेवढे महत्त्व देण्यात आले नव्हते. याच कारणामुळे भाजपाचा कर्नाटकमध्ये पराभव झाला होता, असे काही राजकीय जाणकार म्हणतात. असे असले तरी भाजपा राजस्थानमध्येही याच सूत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे.

वसुंधरा राजे पक्षापासून दूर गेल्या?

गेल्या काही महिन्यांपासून वसुंधरा राजे यांना भाजपाने एक हात दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. वसुंधरा राजे यादेखील पक्षापासून काहीशा दूर झाल्या आहेत. यावर वसुंधरा राजे यांना विरोध करणारे भाजपातील नेते ‘वसुंधरा राजे यांनी गेल्या साडे चार वर्षांत पक्षात योगदान द्यायला हवे होते,’ असे म्हणताना दिसतायत. तर अनेक कार्यक्रमांना वसुंधरा राजेंना आमंत्रितच करण्यात आले नाही, असा दावा राजेंच्या समर्थकांकडून केला जातो.

अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे जनआक्रोश यात्रेला स्थगिती?

राजस्थानमधील ९ जागांसाठीची पोटनिवडणूक, जन आक्रोश यात्रा, परिवर्तन संकल्प यात्रा अशा वेगवेगळ्या क्षणी वसुंधरा राजे अनुपस्थित होत्या. २०१८ सालापासून झालेल्या ९ पोटनिवडणुकांत काँग्रेसने सात जागांवर तर भाजपाने फक्त एका जागेवर विजय मिळवलेला आहे. एका जागेवर भाजपा पुरस्कृत आरएलपीच्या उमेदवाराने बाजी मारलेली आहे. गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश यात्रेचे नेतृत्व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी केले होते. मात्र मध्येच ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. यात्रेला जनतेचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती, असा दावा केला जातो. मात्र करोना महासाथीमुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती, असे भाजपाकडून सांगितले जाते.

परिवर्तन यात्रेपासून वसुंधरा राजे दूरच

भाजपाने राजस्थानमध्ये नुकतेच परिवर्तन यात्रेचे आयोजन केले होते. मात्र या यात्रेलादेखील लोकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यात्रेदरम्यान जोधपूर, फतेहपूर, मेरटा, दौसा, ढोलपूर या ठिकाणांहून सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडीओ, फोटो समोर आले होते. वसुंधरा राजे यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमात चार ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या. नंतर मात्र त्यांनी या यात्रेपासून दूर राहणेच पसंद केले.

राजे यांच्या समर्थक नेत्यांची हकालपट्टी

भाजपाने राजस्थान निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. तसेच निवडणूक व्यवस्थापन समितीचीही स्थापना केली आहे. या दोन्ही समित्यांत वसुंधरा राजे यांना संधी देण्यात आलेली नाही. तसेच गेल्या काही वर्षांत भाजपाने राजे यांच्या गटातील अनेक नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये रोहिताश शर्मा, देवीसिंह भारती अशा नेत्यांचा समावेश आहे. नुकतेच भाजपाने विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलाश मेघवाल यांनाही पक्षातून काढले आहे. मेघवाल हे वसुंधरा राजे गटातील नेते होते.

वसुंधरा राजे आता काहीच करू शकणार नाहीत?

वसुंधरा राजे यांच्याबाबत भाजपा पक्षातील एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “वसुंधरा राजे प्रकरण केंद्रीय नेतृत्वाने उगीचच ताणून धरले आहे. वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही राजकीय रणनीती आखण्यासाठी वेळ शिल्लक नाही. शरद पवार, ममता बॅनर्जी, वाय एस जगन मोहन रेड्डी अशी काही उदाहरणे आहेत, ज्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. मात्र वसुंधरा राजे यांना तसे करण्यासाठी सध्या वेळ शिल्लक राहिलेला नाही,” असे या नेत्याने म्हटले.

राजस्थानमध्ये भविष्यात काय होणार?

दरम्यान, भाजपाच्या एकूण ७० आमदारांपैकी एकूण ४० आमदार अगोदर वसुंधरा राजे यांना पाठिंबा देत होते. मात्र भविष्यातील राजकीय परिस्थिती पाहता हे आमदार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सध्या सर्वांचे लक्ष फक्त तिकीटवाटपावर आहे. आपल्या समर्थकांना तिकीट न मिळाल्यास वसुंधरा राजे संबंधित नेत्याला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा आदेश देऊ शकतात. त्यामुळे राजस्थानमध्ये भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan upcoming assembly election 203 bjp trying to sideline former cm vasundhara raje prd