केरळ विधानसभा निवडणूक तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा केरळ राज्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मतं एकत्रित करीत केरळच्या द्विपक्षीय निवडणूक क्षेत्रात पाय रोवणे आणि महत्त्वाकांक्षी, सुशिक्षित तरुणांना आकर्षित करण्यासाठी माजी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री राजीव चंद्रशेखर यांची निवड करण्यात आली असल्याचे समजते.
तिरुवनंतपुरम येथे पक्षाचे केरळमधील प्रभारी प्रकाश जावडेकर व लोकसभा खासदार अपराजिता सारंगी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोमवारी तिरुवनंतपुरममधील कौडियार येथील उदय पॅलेस कन्व्हेशन सेंटरमध्ये पार पडणाऱ्या पक्षाच्या परिषदेत चंद्रशेखर यांचे नाव अधिकृतपणे घोषित केले जाण्याची शक्यता आहे. केरळमधील पक्षाचे संघटनात्मक निवडणुकांचे प्रभारी, केंद्रीय मंत्री व वरिष्ठ भाजपा नेते प्रल्हाद जोशी हे याबाबत घोषणा करू शकतात.
माझ्या पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी मला अध्यक्षपदासाठी पात्र मानले यासाठी मला आनंद, आश्चर्य व अभिमानही वाटत आहे, असे चंद्रशेखर यांनी बैठकीनंतर दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
गेल्या वर्षी तिरुवनंतपुरममधून काँग्रेसच्या शशी थरूर यांच्याकडून चंद्रशेखर यांना १६ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. निवडणूक प्रचारासाठी केवळ दोन महिने हातात असतानाही चंद्रशेखर यांनी थरूर यांना चांगलीच टक्कर दिली होती. त्यांच्या या प्रयत्नांनी त्यांनी पक्षाला प्रभावित केले.
पक्षाचे गणित नेमके काय?
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त फायदा चंद्रशेखर यांच्यामुळे होऊ शकतो. शिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात पक्षाची परिस्थिती सुधारण्याचं मोठं ध्येय भाजपाचं आहे. राज्यातली हिंदू आणि ख्रिश्चन मतं एकत्रित करण्याची तसंच महत्त्वाकांक्षी, सुशिक्षित तरूणांपर्यंत पोहोचण्याची ताकद चंद्रशेखर यांच्यात आहे. मतांचं ध्रुवीकरण होणाऱ्या केरळसारख्या राज्यात हिंदू तसंच ख्रिश्चन अशा दोन्ही समाजांची मतं मिळवण्यात चंद्रशेखर निर्णायक भूमिका बजावतील असं भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटतं. या विचारातूनच चंद्रशेखर यांच्याकडे केरळ राज्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. चंद्रशेखर स्वत:नायर समुदायातले आहेत. त्यामुळे उच्चवर्गातील हिंदूंची मतं त्यांना मिळण्याची आशा आहे. त्याशिवाय एझावा समुदायाचे प्रमुख नेते वेल्लापल्ली नटेसन यांच्याशी सलोखा राखत भारत धर्म जनसेना या पक्षासोबत भाजपाची युती आणखी मजबूत करतील, अशीही अपेक्षा भाजपाला चंद्रशेखर यांच्याकडून आहे.
ख्रिश्चन समुदायाला पक्षाकडे आकर्षित करील, असा नेता भाजपाला हवा आहे. तसेच राज्यात ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांमधील दरी वाढत असली तरी हे दोन्ही समुदाय सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या प्रभावित आहेत. ख्रिश्चन समुदायाचा एक भाग जो राज्याच्या लोकसंख्येच्या १९ टक्के एवढा आहे, तो पारंपरिकरीत्या काँग्रेसला मत देणारा आहे. हा समुदाय काँग्रेसच्या राजकीय भूमिकेत मुस्लिम समुदायाच्या वाढत्या सहभागामुळे नाराज आहे. काँग्रेसचे नेतृत्व असलेले युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट व सीपीआयच्या नेतृत्वाखालील डाव्या डेमोक्रेटिक फ्रंट या दोन्ही पक्षांबाबत ख्रिश्चन समुदायात उदासीनता आणि नाराजी पाहायला मिळते.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आव्हान लगेचच चंद्रशेखर यांच्यासमोर असेल. यावेळी भाजपा उत्तम संख्येने महानगरपालिका आणि पंचायती जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. चंद्रशेखर तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील भाजपाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जात आहे. महानगरपालिकेच्या विजयामुळे नेमाम व कझाकूटम या विधानसभा मतदारसंघांतील पक्षाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. या दोन्ही मतदारसंघांत भाजपाला मोठ्या संख्येने पाठबळ आहे.
मोठी आव्हानं काय?
दुसरीकडे केरळमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या गटबाजीचा मुद्दाही चंद्रशेखर यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. पक्षातल्या अनेकांना चंद्रशेखर बाहेरचे वाटतात आणि त्याचवेळी त्यांना मानणारा अनुयायी वर्गदेखील पक्षात आहे. “नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी आणि सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी चंद्रशेखर यांना जास्तीत जास्त कष्ट घ्यावे लागतील”, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पक्ष केरळमध्ये आपल्या निवडणूक रणनीतींचे अनुकरण करू पाहत आहे. केरळमधल्या निवडणुकांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपाचा चेहरा असतील. केंद्र सरकारचं धोरण आणि केरळचा विकास या दोन्हीचा समन्वय राखू शकेल असा नेता भाजपला अपेक्षित आहे. राष्ट्रीय पातळीवरील पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कूटनीती केरळमध्ये राबवू शकेल असा चेहरा भाजपाला हवा होता. चंद्रशेखर यांच्या रुपात त्यांना तसं चेहरा मिळाला आहे. विकासाधिष्ठित राजकारणाचे ते केरळमधले प्रतिनिधी असतील असं पक्षाला वाटतं.
चंद्रशेखर हे केरळमधील एक नवा चेहरा आहेत. त्याशिवाय त्यांच्या उद्योगपती होईल अशा प्रतिमेमुळे ते केरळमधील सुशिक्षित तरुणांना पक्षाकडे आकर्षित करू शकतील, असा अंदाज भाजपाला असल्याचे एका नेत्याने सांगितले.
“चंद्रशेखर हे उमदे राजकीय व्यक्तिमत्त्व असून, ते एक अनुभवी राजकारणी म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ते दीर्घकाळ राज्यसभेचे खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना जवळपास जिंकलेलंच पाहिलं आहे,” असं आरएसएसचे विचारवंत व भाजपाचे माजी राष्ट्रीय पदाधिकारी आर. बालशंकर यांनी म्हटले.
“केरळमध्ये नेहमीच असे शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी व्यक्तिमत्त्व आकर्षण ठरले आहेत. केरळधील पक्षात ते आवश्यक प्रेरणा व उत्साह नक्कीच निर्माण करू शकतील, अशी मला खात्री आहे. महत्त्वाचं म्हणजे स्थानिक राजकारणापेक्षा समाजातील सर्व घटकांमध्ये स्वीकार्य आहेत”, असेही बालशंकर म्हणाले.
केरळ भाजपामध्ये चंद्रशेखर यांची प्रमुख म्हणून एंट्री झाल्याने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यासाठी भाजपा आता नव्याने प्रयत्न सुरू करेल. अनेकदा ते तिरुवनंतपुरममधील चर्चमधल्या पुढाऱ्यांशी भेटीगाठी घेत असतात.
ख्रिश्चनबहुल गोवा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले. असे असताना मोदी जरी ख्रिश्चन समुदायाच्या वाढत्या संबंधांवर भर देत असले तरी मागील निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने आता पक्षाला केरळमध्ये नव्याने प्रगती अपेक्षित आहे. २०२३ मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या संघर्षामध्ये ख्रिश्चनांवर हल्ले झाल्यामुळे भाजपाच्या प्रयत्नांना फटका बसला होता.
दुसरीकडे, चंद्रशेखर यांच्यासारखा शांत व स्पष्टवक्ता नेता केरळमधील विविध चर्च आणि तिथल्या पुढाऱ्यांशी संवाद साधून या समुदायाचा विश्वास जिंकू शकेल, अशी अपेक्षा असल्याचे एका भाजपा नेत्याने सांगितले.
चंद्रशेखर हे तीन वेळा राज्यसभेचे खासदार होते. जुलै २०२१ मध्ये त्यांच्या विकासाप्रती असलेल्या दृष्टिकोनामुळे त्यांना मोदी मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले. ते सेमी-कंडक्टर उत्पादन क्षेत्रातले एक तंत्रज्ञानी उद्योजक आहेत.
सरकार आणि संसद यांच्या पल्याड जात चंद्रशेखर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय तंत्रज्ञानाच्या प्रसार आणि प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी अमेरिका, दुबई, ब्रिटन, ब्राझील, व्हिएतनाम या देशांत प्रवास केला आहे. गॅम्बिया, इथिओपिया व मलावी या देशांच्या सरकारांशी त्यांनी व्हर्च्युअली संवादही साधला आहे. एआयच्या युगात तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील प्रशासनात विविध मुद्द्यांसंदर्भात कसा बदल घडवला जाऊ शकतो यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे, तसंच डिजिटलायजेशनवरही त्यांनी भाष्य केले आहे.