संतोष प्रधान
काही राजकीय नेत्यांना कितीही प्रयत्न करूनही संसद किंवा विधिमंडळावर संधी मिळत नाही. काही नेते मात्र यात नशीबवान असतात. काँग्रेसचे राजीव शुक्ला हे असेच एक नशीबवान नेते. काहीही जनाधार नसलेले हे शुक्ला आता चौथ्यांदा राज्यसभेवर निवडून आले आहेत तेही तीन वेगवेगळ्या राज्यांमधून.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राजीव शुक्ला यांची छत्तीसगड राज्यातून बिनविरोध निवड झाली. छत्तीसगढमधून काँग्रेसने दोन्ही उमेदवार बाहेरच्या राज्यातील उभे केले होते. यापैकी एक राजीव शुक्ला हे होते. आधी उत्तर प्रदेश, नंतर दोनदा महाराष्ट्र तर आता छत्तीसगढ अशा तीन राज्यांमधून राज्यसभेवर निवडून येण्याची कामगिरी शुक्ला यांनी केली. राजकीय पक्षांकडून राजकीय लाभ होईल अशा राजकीय नेत्याला राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी दिली जाते. शुक्ला यांच्या खासदारकीमुळे काँग्रेसचा आतापर्यंत किती फायदा झाला आणि भविष्यात होईल हा संशोधनाचाच विषय ठरेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा आयपीएल सामने यामध्येच शुक्ला अधिक सक्रिय असायचे. आयपीएल सामन्यांमधील गैरप्रकारांचे झालेले आरोप व सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याने शुक्ला यांना क्रिकेट संघटनेतून राजीनामा द्यावा लागला होता.
काँग्रेस नेतृत्वाशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळेच शुक्ला यांना पक्षात महत्त्व मिळत गेले. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये शुक्ला हे नियोजन व संसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्री होते. एका बड्या उद्योगपतीचा वरदहस्त असल्यानेच शुक्ला यांचे नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात महत्त्व वाढल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या शुक्ला यांच्या विरोधात काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत तक्रार झाली होती. शुक्ला यांनी आपल्या खासदार निधीचा विनियोग भाजप आमदाराच्या मतदारसंघात केल्याचा आरोप पक्षाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला होता. शुक्ला हे खासदार निधी विकतात, अशीही टीका तेव्हा झाली होती. १२ वर्षे राज्यातून राज्यसभेची खासदारकी भूषवूनही काँग्रेसला काहीच फायदा झाला नाही. राजीव शुक्ला यांनी स्वत:चा मात्र फायदा करून घेतला आहे.