वसई- बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष, माजी महापौर आणि हितेंद्र ठाकूर यांचे आत्येबंधू राजीव पाटील उर्फ नाना यांनी विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांना महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र राजीव पाटील हे भाजपातून लढवण्यासाठी चाचपणी करत आहे. ते भाजपाच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा वसईत रंगली आहे. राजीव पाटील यांनी शहरात त्यांचे वैयक्तिक फलक लावले असून त्यातून पक्षाचे नाव देखील वगळले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई विरारच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर राजीव पाटील हे दुसर्‍या क्रमांकाचे नेते मानले जातात. वसई विरार महापालिकेचे पहिले महापौर, कामगार नेते वसईतील बांधकाम व्यवसातील अग्रणी अशी त्यांची ओळख आहे. राजीव पाटील यांचे वसई विरार शहरात स्वत:चे स्वतंत्र साम्राज्य आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यात राजीव पाटील यांची वैयक्तिक यंत्रणा कार्यरत आहेत. २००९ मध्ये महापालिकेच्या स्थापनेनंतर त्यांना महापौर पदाची संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांना मोठे पद मिळाले नाही. त्यांना विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र २०१४ मध्ये मतदारसंघाच्या पुर्नरचनेननंतर नालासोपारा मतदारसंघातून विधानसभा लढविण्याची इच्छा होती. परंतु आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी देऊन जिंकवून आणले. क्षितीज ठाकूर २००९ पासून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता मात्र राजीव पाटील यांनी आमदारकी लढविण्याची तयारी केली आहे. त्यांचे वय ६५ वर्ष आहे. ही संधी गेली तर पुढील ५ वर्षानंतर वयाच्या सत्तरीनंतर निवडणूक लढविण्याची शक्यता कमी असते. विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी नेतृत्वगुण, संघटन कौशल्य, मनुष्यबळ आणि आर्थिक ताकद असे जे गुण असावे लागतात ते राजीव पाटील यांच्याकडे आहेत. माझी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. मला पक्षाने तिकिट दिले तर मी निवडणूक लढवेन असे राजीव पाटील यांनी सांगितले. मात्र नालासापोरा आणि वसई हे दोनच खुले मतदार संघ असल्याने राजीव पाटील यांना बविआतर्फे तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा >>>Delhi Politics : दिल्लीत भाजपा ‘आप’चा खेळ बिघडवणार? विधानसभेसाठी आखली ‘ही’ योजना

राजीव पाटील भाजपाच्या वाटेवर..?

राजीव पाटील यांनी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी भाजपातून उमेदवारी मिळविण्याचे सुरू प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नालासोपारा मतदारसंघातून ते ईच्छुक आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांच्या बैठकाही संपन्न झाल्याचे समजते. याबाबत राजीव पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मला महाविकास आघाडी आणि महायुतीसह सर्वच पक्षांची ऑफर आहे. मात्र मी कुणालाही नकार दिलेला नाही अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. दुसरीकडे वसईत बहुजन विकास आघाडीला शह द्यायचा असेल तर राजीव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही, हे भाजपाला कल्पना आहे. त्यामुळे महायुतीने राजीव पाटील यांना गळाला लावण्याचे प्रयत्न खूप आधीपासूनच सुरू केले आहेत. राजीव पाटील यांनी १ ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस धुमधडक्यात साजरा करून एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केले. तो याचाच एक भाग मानला जात आहे. सध्या शहरात राजीव पाटील याचे नवरात्रोत्स, दिवाळी आणि दसरा सणाच्या शुभेच्छा देणारे फलक लागले आहेत. त्यातून पक्षाचे नाव वगळण्यात आले आहे. केवळ वैयक्तिकत कामगार नेते, माजी महापौर अशा नावांनी या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्याची देखील मोठी चर्चा शहरात आहे.

हितेंद्र ठाकूरांच्या खेळीकडे लक्ष

हितेंद्र ठाकूर हे कसलेले नेते आहे. मागील ४० वर्षात ते सर्वप्रकारचे राजकारण कोळून प्यायलेले आहेत. त्यामुळे राजीव पाटील यांचे संभाव्य बंड रोखण्यासाठी ते मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. राजीव पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांचे बंड थांबवणे हा एक पर्याय आहे. दुसरीकडे महायुतीला पाठिंबा देऊन वसई आणि नालासोपारा हे दोन्ही मतदारसंघ ते भाजपाकडून घ्यायचे असा पर्याय आहे. त्यामुळे राजीव पाटील यांचा भाजपातील मार्ग आपोपाप बंद होईल. कारण राजीव पाटील हे अपक्ष लढून जिंकू शकणार नाही. या राजकीय घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर ठाकूर येत्या काही दिवसात काय निर्णय घेतात त्याकडे लक्ष लागले आहे. राजीव पाटील भाजपात गेल्यास वसईच्या राजकारणातील मोठा भूकंप ठरणार आहे, एवढं मात्र निश्चित.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv patil is preparing to contest the assembly elections 2024 from bjp vasai print politics news amy