२०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीवरुन आता आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, ६६-६७ टक्के मतदान कमी आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र, विरोधी आघाडीला आपल्या मतदारांमध्ये मतदानासाठीचा उत्साह निर्माण करण्यात अपयश आल्यामुळेच हा टक्का घटला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, इंडिया आघाडी एनडीएच्या सरकारला पर्याय ठरु शकते, यावरुन लोकांचा विश्वास उडाला आहे. म्हणूनच, त्यांना समर्थन देणारे लोकही मतदानासाठी बाहेर पडत नाहीत.
राजनाथ सिंह यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत ५४ मतदारसंघांमध्ये ५१ प्रचारसभा घेतल्या आहेत. ते लखनौ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर सविस्तर भाष्य केले आहे; तसेच इंडिया आघाडीच्या प्रचाराला प्रत्युत्तरही दिले आहे. ते म्हणाले की, “आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर संविधान बदलू, असा प्रचार इंडिया आघाडी करते आहे. मात्र, काँग्रेसच्या सत्ताकाळातच तब्बल ८५ घटनादुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांनी घटनेचा आत्मा असलेल्या प्रास्ताविकेतही बदल केला. असे असतानाही दोष आम्हालाच देताl. संपत्तीचे फेरवाटप आणि वारसा कर यांसारख्या संकल्पनांचा प्रचार करुन काँग्रेस लोकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण करत आहे. अशा संकल्पनांमुळे आर्थिक मंदी निर्माण होऊ शकते तसेच लोक संपत्ती निर्माण करण्यापासून परावृत्त होऊ शकतात.”
हेही वाचा : भाजपा सरकार असतानाही माजी पंतप्रधान वाजपेयींचे गाव अनेक दशकांपासून महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत
एकूणच प्रचाराची पातळी घसरत चालली आहे का? या प्रश्नावर राजनाथ सिंह म्हणाले की, काँग्रेसला नेमके काय म्हणायचे आहे ते लोकांना समजेल अशा भाषेत आम्हाला सांगावे लागले. पुढे पंतप्रधान मोदींच्या मुस्लिमांसंदर्भातील विधानाबाबत ते म्हणाले की, “या विधानाचा मथितार्थ समजून घ्या. सॅम पित्रोदा वारसा कराबद्दल बोलले. यामुळे आर्थिक मंदी येणार नाही का? तुम्हीच मला सांगा. देशाचा एक्स-रे काढू अथवा सर्वेक्षण करु असे ते म्हणत आहेत. याचा अर्थ काय आहे? सामान्य लोकांसाठी हे महत्त्वाचे आणि गंभीर मुद्दे आहेत.”
सूरतमध्ये भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला तर इंदूरमध्ये काँग्रेस उमेदवाराला भाजपात घेण्यात आले. त्यांनी या सगळ्या घटनांवरही उत्तर दिले आहे. सूरतमधील घडामोडींवर ते म्हणाले की, “स्वतंत्र भारतात अशाप्रकारची बिनविरोध निवडणूक २८ वेळा झाली आहे. आजवर काँग्रेसचे २० उमेदवार बिनविरोध निवडून संसदेत गेले आहेत.” पुढे इंदूरमधील घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले की, “अशा उमेदवाराला तुम्ही उमेदवारी देताच कशाला? जर एखादा उमेदवार आमच्याकडे येऊन पाठिंबा देण्याविषयी विचारत असेल, तर आम्ही त्याला नकार द्यावा का? आम्ही त्याच्याकडे गेलो नव्हतो. कदाचित त्याला असे वाटले असेल की मोदी सरकार चांगले काम करते आहे आणि आपण या मतदारसंघातून जिंकू शकत नाही. या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला दोषी कसे धरता? तुमच्या उमेदवाराला शेवटपर्यंत तुमच्या बाजूनेच ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे.”
पहिल्या दोन टप्प्यांमधील मतदानाचा टक्का घसरला म्हणून भाजपाच्या चारशेपार जाण्याच्या ध्येयावर कसलाही परिणाम होणार नसल्याचेही ते म्हणाले. पुढे राजनाथ सिंह म्हणाले की, “अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांनाही या देशात तेवढाच हक्क आहे जितका इतरांना आहे. प्रश्न असा आहे की, आपण त्यांच्यामध्ये भेदभाव करतो आहोत का? सरकारच्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवताना कोणता भेदभाव झाला आहे का? तर असे काही झालेले नाही. अल्पसंख्याक हे देशातील दुय्यम नागरिक नाहीत. आम्ही त्यांना इतरांप्रमाणेच वागणूक देतो. बहुसंख्य असो वा अल्पसंख्य, प्रत्येकाला समान अधिकार आहेत. समाजातील दलित आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांची उन्नती करणे हे आमचे ध्येय आहे.”
हेही वाचा : सरकारी पैशांचा अपव्यय ते नैराश्य; सूरत मतदारसंघातून माघार घेणाऱ्या आठ जणांनी काय कारणे दिली?
राजनाथ सिंह यांनी काही दिवसांपूर्वी ‘पाकिस्तानात घुसून भारतीय भूमीवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांना भारत ठार मारेल’, असे विधान केले होते. त्यांना असे विधान का करावेसे वाटले, या प्रश्नावर ते म्हणाले की, “परदेशी दहशतवादी हे चीन, बांगलादेश किंवा ब्रह्मदेशातून नव्हे तर पाकिस्तानातून येतात. जर ते आपली नियंत्रण रेषा ओलांडत असतील आपण त्यांच्यावर गोळीबार करु नये का? त्यांना ठार मारु नये का?”