गेल्या काही महिन्यांत हरियाणातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध समुदायांच्या महापुरुषांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रम राबवले आहेत. अशाच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी झज्जर जिल्ह्यातील कुलाना गावात १२व्या शतकातील राजा पृथ्वीराज चौहान यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आहे.
या कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले की, राष्ट्रीय हितांचं रक्षण करणं, हे भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचं मुख्य लक्ष्य आहे. भारतावर कुणीही वाईट नजर टाकली, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. भारत आता कमकुवत देश राहिलेला नाही. आमचा शांततेवर विश्वास आहे. पण आम्हाला कुणी हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जातं, हे आपल्या सैनिकांनी वारंवार सिद्ध केलं आहे, असं विधान सिंह यांनी केलं. यावेळी त्यांनी २०१६ सालच्या सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ च्या बालाकोट एअर स्ट्राइकचा संदर्भ दिला.
हेही वाचा- तामिळनाडू सरकारने EWS आरक्षण नाकारलं; भाजपासह AIADMKचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार
हरियाणा आणि झज्जर प्रदेशाला गौरवशाली इतिहास लाभला असून ही शूरांची भूमी आहे, असंही सिंह म्हणाले. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्याग आणि शौर्याची प्रेरणा असलेल्या या शूर भूमीला मी सलाम करतो. गलवान खोऱ्यात जेव्हा संघर्ष निर्माण झाला होता, तेव्हा आपल्या सैन्याने शौर्य आणि धैर्य दाखवलं. पृथ्वीराज चौहान आणि राव तुला राम यांच्यासारख्या महान शूर-वीरांचे पुतळे आपल्याला जीवनात पुढे जाण्यास शिकवतात,” असंही राजनाथ सिंह म्हणाले.
हेही वाचा- EWS Quota Verdict : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे का आहे काँग्रेस गोंधळात?
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणाच्या विकासासाठी प्रशंसनीय काम केलं आहे. लोकांसाठी आणि समाजासाठी जिद्दीने काम करणारा मुख्यमंत्री मिळणं आजच्या घडीला विरळ आहे. खट्टर यांनी कर्नाल जिल्ह्यातील तारौरी येथे पृथ्वीराज चौहान यांच्या नावाने ‘संशोधन संस्था आणि स्मारक’ बांधण्याची घोषणा केली आहे. तसेच हरियाणा सरकारने ‘संत महापुरुष विचार प्रसार योजना’ राबवून महापुरुषांचे विचार पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हरियाणातील राजपूत समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.