कुटुंबासह परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे दिल्लीला जाणार आहेत. आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत नायडू यांची दिल्लीत भेट होणार आहे. शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांचीही ते भेट घेणार आहेत. ही भेट राजकीय रणनीती, राज्यासंदर्भातील मुद्दे यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. राज्यसभेतील रिक्त जागा आणि वक्फ बोर्ड या काही मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार असल्याची चिन्हं आहेत. नायडू आणि अमित शाह केवळ आंध्र प्रदेश राज्याचा विचार करून प्रशासकीय मुद्द्यावरच चर्चा करतील, अशीही अपेक्षा आहे. मात्र, राजकीदृष्ट्या ही एक महत्त्वाची बैठक असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी वायएसआर काँग्रेसचे नेते विजय साई रेड्डी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला. सहा वर्षांच्या कार्यकाळातील साडेतीन वर्षे शिल्लक असताना त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यसभेची ही जागा रिक्त आहे. त्यासाठीच्या निवडणुकीची अधिसूचनाही जाहीर झाली आहे. तसेच अंतिम नामांकनं २९ एप्रिलपर्यंत स्वीकारली जाणार आहेत.

याआधीही विरोधी पक्ष असलेल्या वायएसआरसीपीच्या दोन खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेत दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन्ही जागांवर सत्ताधारी तेलुगू देसम पक्षानं दावा केला होता. सध्या रिक्त असलेली जागा ही भाजपाच्या कोट्याखाली येण्याची शक्यता आहे.

राज्यसभेतली जागा

के. अन्नामलाई यांचे तमिळनाडूहून केंद्रात स्थलांतर झाल्यामुळे भाजपा त्यांना ही राज्यसभेची जागा देण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये पक्षाच्या नेतृत्वाची पुनर्रचना करण्यासाठी, तसेच अण्णाद्रमुकसोबत झालेल्या युतीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीचा एक भाग म्हणून अन्नामलाई यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला होता. त्यानंतर अन्नामलाई यांच्या जागी नैनर नागेंद्रन यांची राज्याचे भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आंध्र प्रदेशातून निवडणूक जिंकण्यासाठी संख्याबळ हा मुद्दा नाही. कारण- टीडीपीच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ आहे. दुसरीकडे आंध्र आणि बिहारमध्ये वक्फ कायद्याविरोधात व्यापक निदर्शने झाली. या दोन्ही राज्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे विरोधी खासदार कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत असल्याची परिस्थिती सध्या टीडीपी आणि जेडीयू पक्षाची आहे. यावरूनच विरोधकांना कसे तोंड द्यायचे याबाबतही नायडू हे अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा करू शकतात.

दिल्लीत असताना शाह यांच्या भेटीव्यतिरिक्त प्रलंबित पोलावरम प्रकल्पाबाबत जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांचीदेखील नायडू भेट घेतील. तसेच ते राज्याशी संबंधित विषयांवरही चर्चा करतील. प्रामुख्याने आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यातील अपूर्ण आश्वासनांकडे लक्ष वेधण्यासाठी कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचीही ते भेट घेतील. २०१४ ते २०१८ पर्यंत टीडीपी केंद्रातील आघाडीचा भाग होता. लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यातील अपूर्ण आश्वासनांवरून नायडू यांनी एनडीएसोबतची युती संपवली. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असतानाच ते केंद्रात सहयोगी पक्ष म्हणूनच परतले नाहीत, तर राज्यात युतीचं सरकारदेखील चालवत होते.

केंद्रातील नेतृत्वांसोबत आधीच्या भेटी

याआधीही चंद्राबाबू नायडू यांनी मार्च महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्याला मिळणारा निधी आणि इतर प्रमुख मुद्द्यांबाबत चर्चा झाली होती. त्याआधी डिसेंबर २०२४ मध्ये नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील आर्थिक तुटीबाबत आणि केंद्र सरकारच्या सहकार्याबाबत चर्चा केली होती. तसेच आधीच्या सरकारच्या ९४ केंद्रीय योजनांमधील निधीच्या दुरुपयोगाकडेही त्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या या बैठकीत नायडू यांनी आंध्र प्रदेशला मिळणाऱ्या निधीबाबत चर्चा केली होती.
दरम्यान, याआधी दोन वेळा केंद्रातील मंत्र्यांना आणि पक्षनेतृत्वाला भेट दिल्यानंतर आजच्या भेटीत चंद्राबाबू नायडू हे अमित शाह यांच्याशी नक्की काय चर्चा करतील आणि पुढची रणनीती कशी आखतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.