सौरभ कुलश्रेष्ठ

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप या एकेकाळच्या मित्रांनी व गेल्या अडीच वर्षातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी पक्षांनी आपले उमेदवार उतरवल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. आमदार मतदारांना खूश करण्यासाठी शिवसेना व शिवसेनेच्या सहयोगी पक्षाच्या आमदारांची तीन दिवस पंचतारांकित सोय करण्यात आली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी दहा जूनला मतदान होणार आहे. त्याआधी आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप युक्ती लढवणार हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आणि शिवसेनेच्या सहयोगी पक्षांच्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्या राहण्याची सोय ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. ८ ते १० जून असे तीन दिवस या आमदारांना पंचतारांकित आदरातिथ्याचा आनंद लुटता येणार आहे.

संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर लातूर भाजपामध्ये आक्षेप

शिवसेनेच्या आणि शीत सहयोगी पक्षांच्या आमदारांनी आठ ते दहा जून या काळात मतदारसंघात न राहता मुंबईत यावे. सर्वांच्या निवासाची सोय ट्रायडेंट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे, असे पत्र आमदारांना पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा या निवासस्थानी सोमवार ६ जून रोजी आमदारांची बैठक घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने दुसऱ्या जागेसाठी उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यसभेच्या मतदानाचा चुकूनही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना दक्ष झाली असून आमदारांना खुश ठेवण्यासाठी आणि मतांची पळवापळवी होऊ नये यासाठी पंचतारांकित सोयीसुविधांचा घाट घालण्यात आला आहे.