येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी केली जात आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. दरम्यान, याच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला एकूण १५ दाम्पत्यांना यजमान म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील काही दाम्पत्य हे दलित, आदिवासी, इतर मागास प्रवर्गातील तसेच इतर जातीचे आहेत.
विधीमध्ये सहभागी होण्याची संधी
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने शनिवारी एकूण १४ यजमान दाम्पत्याची यादी जाहीर केली. एका दाम्पत्याचे नाव नंतर जाहीर केले जाणार आहे. यजमानपदाचा मान मिळालेली ही १५ दाम्पत्य राम मंदिराच्या उद्घाटनादरम्यानच्या विधीमध्ये सहभागी होणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी, मोहन भागवत, ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील उपस्थित असतील.
वनवासी कल्याण आश्रमाचे रामचंद्र खराडी यजमान
सध्या जाहीर केलेल्या १४ दाम्पत्यांत संघाशी निगडित असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी यांचाही समावेश आहे. खराडी हे आदिवासी समाजातून येतात. ते मूळचे उदयपूरचे आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील तीन दाम्पत्यांनाही यजमानपदाचा मान मिळालेला आहे. यामध्ये अनिल चौधरी, काशीच्या डोम राजांचा समावेश आहे. डोम राजा हे मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर चितेला आग देण्याचे काम करतात. वाराणसीतील कैलाश यादव आणि कविंद्र प्रताप सिंह अशा आणखी दोघांना यजमानपदाचा मान मिळालेला आहे.
आणखी कोणाकोणाला यजमानपदाचा मान
यजमानपदाचा मान मिळालेल्यांमध्ये आसामचे राम कुई जेमी, जयपूरचे सरदार गुरूचरण सिंह गील, रविदासी समाजातून येणारे हरदोईचे कृष्णा मोहन, मुलतानीचे रमेश जैन, तमिळनाडूचे अदलरासन, मुंबईचे विठ्ठलराव कांबळे, लातूरचे महादेवराव गायकवाड, कर्नाटकातील लिंगराज वसावराज अप्पा, लखनौचे दिलीप वाल्मिकी, हरियाणातील अरुण चौधरी यांचा समावेश आहे.
अनिल मिश्रा प्रमुख यजमान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी या यजमानांतील प्रधान यजमान असतील. प्राणप्रतिष्ठेशी नगडित सर्व विधी पार पाडतील. मिश्रा हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या ट्रस्टींपैकी एक आहेत. राम मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रावर आहे.