गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम बंगालमध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. त्यामागोमाग जातीय तणाव आणि हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. या वेळीही काही वेगळी परिस्थिती नाही. ६ एप्रिलला होणाऱ्या रामनवमीच्या उत्सावाआधी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील तणावामुळे मालदा जिल्ह्यातील मोठाबारी भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी पोलिसांनी विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांना मोठाबारी इथे रॅलीसाठी परवानगी नाकारली. त्यानंतर त्यांनी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याशिवाय राज्यातील भाजपा प्रमुख व केंद्रीय मंत्री सुकांता मुजुमदार यांनाही मोठाबारी येथे जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर प्रारंभिक रॅली मोठाबारी इथल्या स्थानिक मशिदीजवळून जाताना मोठा जातीय तणाव निर्माण झाला होता. या कारणामुळे पोलिसांनी या परवानग्या नाकारल्या.

२९ मार्चला पोलिसांनी लोकांना सोशल मीडियावरील चिथावणीखोर पोस्टकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते. ईद आणि रामनवमीदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी इशारा दिला होता. चिथावणीखोर आणि भाजपाच्या विभाजनकारी राजकारणाला बळी पडू नका, असा सल्ला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुस्लिम समुदायाला दिला होता. त्यानंतर बुधवारी ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा सर्व समुदायांच्या लोकांना रामनवमी उत्सवादरम्यान शांतता राखण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
२०१७ मध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा रामनवमी उत्सव पश्चिम बंगालमध्ये झाला होता. संघ परिवाराने यावेळी सहा मेगा रॅली आणि १७५ ठिकाणी उत्सवाचे आयोजन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुस्लिम बहुसंख्य असलेल्या कोलकाताच्या बंदर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

२०१८ मध्ये आसनसोल इथल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. तत्कालीन भाजपा खासदार व सध्याचे तृणमूल काँग्रेसचे मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यामध्ये एका इमामाच्या मुलाची हत्या झाली होती. मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये एका १६ वर्षीय मुलाचा समावेश होता. हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप काही हिंदू संघटनांनी त्यावेळी केला होता.

२०२३ मध्ये रामनवमीच्या सुमारास पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांत जातीय दंगली झाल्या. त्यावेळी बंगालच्या हावडा जिल्ह्यातील शिबपूरमध्ये जमावाने तोडफोड केली आणि दुकाने, तसेच वाहनांवर हल्ले केले. दगडफेक करीत पोलीस आणि माध्यमांना त्यावेळी लक्ष्य करण्यात आले होते. गेल्या वर्षी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर भागात रामनवमीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला होता. तेव्हा स्फोटकांचा वापर करण्यात आला होता आणि दगडफेकही झाली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी आणि भाजपा यांनी एकमेकांवर हिंसाचाराला जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

विहिंपची भूमिका
संघ परिवाराचा भाग असलेल्या विहिंपने रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांची घोषणा केली आहे. राज्यभरात दोन हजारांहून अधिक रॅली, २०० चित्ररथ, पाच हजारांहून अधिक ठिकाणी श्रीराम महोत्सव आयोजित करणार असल्याचे सांगितले आहे.
“यापूर्वी कधीही झाला नाही असा रामनवमी उत्सव साजरा करण्याची योजना आम्ही आखत आहोत. तसेच श्रीराम महोत्सवाचं आयोजनही करणार आहोत. पोलिसांशी चर्चा सुरू असली तरीही ते आम्हाला पुरेशी सुरक्षा देऊ शकतील, असं वाटत नाही. आमच्यावर हल्ला झाल्यास आम्ही प्रत्युत्तर नक्कीच देऊ”, असं विहिंपचे दक्षिण बंगालचे सचिव चंद्रनाथ दास यांनी म्हटले आहे.
“सिलीगुडीमध्ये कौटुंबिक मूल्ये, सामाजिक एकता, महिला सक्षमीकरण, तसेच आदिवासी क्रांतीचे प्रतीक बिरसा मुंडा यांवर प्रकाश टाकणारे १५६ चित्ररथ असतील”, अशी माहिती विहिंपचे उत्तर बंगालचे सचिव लक्ष्मण बन्सल यांनी दिली.

“राज्य सरकार दरवर्षी रामनवमीच्या रॅलींमध्ये सुरक्षा देण्यात अपयशी ठरते. गेल्या वर्षी सेरामपूर, हुगळीच्या काही भागांत व डालखोला येथे रॅलीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर एनआयए चौकशीचे आदेश देत काहींना अटकही करण्यात आली. बंगाल पोलीस हे का थांबवू शकत नाही? मुस्लिमांनीही उत्सव साजरा करण्यासाठी पुढे यावं. राम हे त्यांचे पूर्वज आहेत”, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री सुकांता मुजुमदार यांनी केले आहे.

यावेळीही असे प्रकार होण्याची भीती असल्याचे ते म्हणाले. “गेल्या वर्षी पोलिसांनी मला हावडा येथे प्रवेश दिला नाही. हिंदू समाजानंही प्रत्युत्तर द्यावं. जर रामनवमीच्या वेळी हिंदूंना रॅली काढण्यापासून रोखले गेलं, तर आम्हीही योग्य तो मार्ग काढू आणि भाजपाही सोबत असेलच”, असेही मुजुमदार यावेळी म्हणाले.

“नंदीग्राममध्ये अयोध्येतील भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे आणि त्याची पायाभरणी ६ एप्रिलला करण्यात येईल, अशी घोषणा सुवेंदु अधिकारी यांनी केली आहे. “धर्म प्रत्येकाचा आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धा आहेत. त्याला कोणताही विरोध नाही. मात्र, धार्मिक लोकांनी त्यांच्या सणांचा वापर प्रतिगामी राजकारणासाठी केला जात आहे का ते पाहावे”, असे वक्तव्य भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)चे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी धार्मिक ध्रुवीकरणाला विरोध करताना केले. राज्यभर आमच्या पक्षाचे सहकारी सतर्क आहेतच, असेही ते पुढे म्हणाले. जातीय हिंसाचार रोखण्यासाठी छावण्या उभारल्या जातील आणि पहारे दिले जातील, असे सीपीआय (एम) विद्यार्थी संघटनेचे सचिव देबांजन डे यांनी सांगितले.

माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन यांनी सध्याच्या या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच जबाबदार धरले आहे. “मुख्यमंत्री आरएसएसविरुद्ध कधीही बोलल्या नाहीत. तुम्ही आता भाजपाविरुद्ध विधानं करत आहात. या पक्षाला तुम्हीच राज्यात प्रवेश करू दिला. आतापर्यंत आरएसएस आणि भाजपाविरुद्ध कोणी सतत लढले असतील, तर ते काँग्रेस आणि डावे पक्ष आहेत”, असे रंजन यांनी म्हटले.

पश्चिम बंगालमध्ये रामनवमी उत्सवाचा इतिहास
कोलकातामधील विद्यापीठाचे इतिहासकार अमित डे यांनी रामनवमी उत्सवाच्या इतिहासाबाबत सांगितले. “बंगालमध्ये रामनवमी काही वर्षांपासून साजरी केली जात आहे. माझ्या बालपणी किंवा तारुण्यातही कोलकात्यात रामनवमी साजरी झालेली मी पाहिलेलं नाही”, असे डे म्हणाले.

“भारतीय स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या तीन ते चार दशकांमध्ये रामनवमीदरम्यान हिंसाचाराची पार्श्वभूमी दिसून आली नाही. रामनवमीच्या मिरवणुका खूप भव्य होत्या याबाबत काही स्पष्टताही नाही. रामाचा जन्म मोठ्या मिरवणुकीत नाही, तर मंदिरे आणि घरांमध्ये आनंदाने साजरा केला जात असे, अशी माहिती राजकीय विश्लेषक आशुतोष वार्ष्णेय व भानू जोशी यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली होती. “हिंदू राष्ट्रवादाच्या उदयाबरोबर परिस्थिती बदलली. शांतीप्रिय मर्यादा पुरुषोत्तम रामाला हिंदू शक्तीचे आक्रमक प्रतीक बनवण्याचा प्रयत्न केला. रामभक्ती आता सर्वांना करुणेने सामावून घेणारी धार्मिक प्रथा राहिलेली नाही”, असेही त्यांनी विश्लेषणात म्हटले होते.