Arun Govil BJP Loksabha Candidate भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या उमेदवार यादीत काही सेलिब्रिटींना स्थान दिले आहे. यात बहुचर्चित ‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांच्या नावासह सिनेअभिनेत्री कंगना रणौतच्या नावाचा समावेश आहे. चार दशकांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘रामायण’ मालिका देशभर गाजली होती. तेव्हा लोक या मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची पूजा करत असायचे. याच मालिकेतून अरुण गोविल घराघरात पोहोचले.
प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेसाठी देण्यात आला होता नकार
हे अनेकांना माहीत नाही की, रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकेतून ओळख मिळवणार्या अरुण गोविल यांना प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी नाकारण्यात आले होते. गोविल यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि मित्रांनीदेखील त्यांना धार्मिक कार्यक्रमात काम न करण्याचा सल्ला दिला होता. धार्मिक कार्यक्रमात काम केल्याने त्यांच्या सिने कारकिर्दीला धक्का पोहोचू शकतो, असे त्यांचे सांगणे होते.
“मला नकार दिल्यानंतर, रामानंदजींच्या मुलांनी मला भरत किंवा लक्ष्मणची भूमिका साकारायला सांगितले. परंतु, प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारण्याची माझी तीव्र इच्छा होती”, असे गोविल यांनी २०१९ मध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते. हे पात्र साकारता येण्याचे श्रेय ते नियतीला देतात आणि त्यांच्या हसर्या चेहर्याने मर्यादा पुरुषोत्तमांची भूमिका साकारण्यास मदत झाल्याचेही ते सांगतात.
तीन वेळा विजयी झालेल्या खासदाराला डावलून गोविल यांना तिकीट
रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गोविल यांना त्यांचे जन्मस्थान मेरठमधून उमेदवारी जाहीर केली. मेरठ मतदारसंघ पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये येतो. निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम उत्तर प्रदेश भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात राज्यातील ८० पैकी १९ जागा आहेत. २००९ पासून सलग तीन वेळा मेरठमधून विजयी झालेले विद्यमान खासदार राजेंद्र अग्रवाल यांना डावलून भाजपाने गोविल यांना तिकीट दिले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, अग्रवाल यांनी बहुजन समाज पक्षा (बसप) चे हाजी याकूब कुरेशी यांचा ४,७२९ मतांच्या फरकाने पराभव केला होता. परंतु, २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी बसपच्या मोहम्मद शाहिद अखलाक यांचा २.३२ लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. आगामी निवडणुकांसाठी, भाजपाने जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) बरोबर जागावाटप करार केला आहे. आरएलडी पश्चिम उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचा पक्ष आहे. गेल्या महिन्यात आरएलडीने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जाण्यासाठी इंडिया आघाडी सोडली. भाजपाने पश्चिम उत्तर प्रदेशमधील बागपत आणि बिजनौर या दोन जागा आरएलडीला दिल्या आहेत.
चित्रपटांमध्येही साकारल्या अनेक भूमिका
प्रभू रामचंद्रांचे पात्र साकारल्यानंतर लोकांच्या मनात त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. असे असले तरी गोविल यांनी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या. त्यांनी शालेय नाट्यगृह सुरू केले. मेरठच्या शासकीय आंतर महाविद्यालयातील नाटक मंडळाचेही ते सदस्य होते. १९७० च्या दशकाच्या मध्यात मुंबईतील राजश्री प्रॉडक्शनने त्यांना ‘पहेली’ (१९७७) चित्रपटाची ऑफर दिली. काही वर्षांनंतर राजश्री प्रॉडक्शनने गोविल मुख्य भूमिकेत असलेले तीन चित्रपट प्रदर्शित केले. ‘सावन को आने दो’ चित्रपटात त्यांनी जरीना वहाबने सकारलेल्या चंद्रमुखी या पात्राच्या प्रेमात पडलेल्या एका तरुण ग्रामीण गायकाची भूमिका साकारली. ‘साँच को आंच नहीं’ मध्ये गोविल आणि मधु कपूर यांना तरुण प्रेमी युगलांच्या रूपात दाखवण्यात आले होते, ज्यांना त्यांच्या कुटुंबातील संघर्षाचा सामना करावा लागला. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. परंतु, त्यांचा तिसरा चित्रपट ‘और सीता’ फार कमाई करू शकला नाही.
लोकांच्या भावना दुखावू नये म्हणून सोडली सिगारेट
प्रादेशिक चित्रपटसृष्टीतही गोविल यांना संधी मिळाली. १९८५ मध्ये त्यांनी रामानंद सागरांनी निर्मित केलेली मालिका ‘विक्रम और बेताल’ मध्ये राजा विक्रमची भूमिका साकारली. रामानंद सागर दूरदर्शनसाठी ‘रामायण’ मालिका तयार करणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. गोविल यांनीही या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्यासाठी ऑडिशन दिली होती.
“जे काही घडते त्याच्या दोन बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. एकीकडे श्रीरामचंद्रांची भूमिका करणारा अभिनेता म्हणून माझी ओळख झाली. दुसरीकडे मी विचार करू लागलो, ‘मला केवळ याच भूमिकेने ओळख का दिली, इतर भूमिकांनी का नाही?’ त्यानंतर मला त्याच प्रकारच्या भूमिका मिळू लागल्या. मी सिगारेट पिणे पूर्णपणे बंद केले, कारण लोक येऊन माझ्या पायाला हात लावत असायचे. त्यांच्या नजरेत माझी प्रतिमा वेगळी होती. त्यांच्या भावना दुखावू नये म्हणून मी हा निर्णय घेतला. आपल्या देशातील धर्माचा आदर केला पाहिजे”, असे गोविल म्हणाले. अलीकडेच गोविल यांनी ‘कलम ३७०’ (पंतप्रधानांची भूमिका) आणि ‘ओएमजी२’सारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
तीस वर्षांनंतर गोविल यांनी अतुल सत्य कौशिक ब्रॉडवे-स्टाईल प्रॉडक्शन निर्मित ‘द लीजेंड ऑफ राम: एक शब्द, एक बान, एक नारी’ या कार्यक्रमात व्यासपीठावर श्रीरामचंद्रांची भूमिका साकारली. अतुल सत्य कौशिक यांनी गोविल यांची प्रशंसा केली. “ते १० मिनिटांपूर्वीच तालमीला यायचे. कधीकधी तर ते स्टुडिओचे दरवाजे उघडण्याआधीच येऊन बसायचे. सर्व ओळी लक्षात ठेवून ते तालमीला सुरुवात करायचे. विशेष म्हणजे ओळी लक्षात रहाव्यात म्हणून ते सहकलाकारांचीही मदत करायचे,” असे कौशिक यांनी सांगितले.
“लाखो मतदारांप्रती संसद सदस्यांची जबाबदारी नाही का?” – गोविल
या नाटकाच्या शेवटी प्रभू रामचंद्र म्हणतात, “प्रजा के हित के आगे राजा शून्य हो जाता है. (अखेर राजा प्रजेच्या हितासाठीच सर्वकाही करतो). या ओळीचा गोविल यांच्यावर खूप प्रभाव पडलेला दिसत होता. “हा राजकारण्यांसाठी सकारात्मक संदेश आहे. ज्या लाखो मतदारांनी संसद सदस्यांना निवडून दिले, त्याच मतदारांप्रती संसद सदस्यांची जबाबदारी नाही का? फक्त निवडणूक जिंकणे पुरेसे आहे का? जेव्हा रामाच्या प्रजेपैकी एकाने सीता मातेवर संशयाचे बोट उचलले, तेव्हा प्रथम एक राजा म्हणून रामाने आपले कर्तव्य पार पाडले”, असे ते २०१९ मध्ये नाटकाच्या प्रचार कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.
राम मंदिर मुख्य मुद्दा
उल्लेखनीय म्हणजे, रामायणातील रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी आणि याच मालिकेत सीता मातेची भूमिका साकारणार्या दीपिका चिखलिया यांनाही भाजपाने १९९१ मध्ये राम मंदिरासाठीचे आंदोलन शिखरावर लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत उतरवले होते. या वर्षी २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. लोकसभा निवडणुकीत हाच भाजपाचा मुख्य मुद्दा असणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने उत्तर प्रदेशच्या उमेदवार यादीत गोविल यांची निवड केली आहे, ज्याचा भाजपाला नक्कीच लाभ होईल, असे सांगितले जात आहे. येत्या आठवड्यात पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या जागेची निवडही विचार करून करण्यात आली आहे.
हेही वाचा : खरा ओपीएस कोण? इथे तर वेगळीच लढाई…
रावण आणि सीतामातेनेही लढवली होती निवडणूक
गुजराती चित्रपट अभिनेते आणि लंकेशची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनी साबरकांठा मतदारसंघातून पदार्पण करत निवडणूक जिंकली होती. १९९६ च्या निवडणुकीत, गुजरातचे माजी मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी यांच्या पत्नी काँग्रेस उमेदवार निशा चौधरी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. गुजराती अभिनेत्री आणि सीतामातेची भूमिका साकारणार्या दीपिका चिखलियादेखील १९९१ मध्ये वडोदरा येथून भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या.