प्रदीप नणंदकर
उत्तम वक्ता, संघटक अशी ओळख असणारे रामचंद्र तिरुके लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष निवडणुकीच्या राजकारणातही तसे आघाडीवर. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते ही ओळख त्यांनी जपली आणि आतापर्यंत टिकवली.
हेही वाचा… मनोज मोरे : प्रस्थापितांशी संघर्ष
५० वर्षांचे तरुके यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपच्या शाखा सताळ्याचे अध्यक्षपदापासून झाली. उदगीर तालुका सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्याकडे १९९५ साली आली. १९९९ ते २००५ भाजप युवा मोर्चाचे ते लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राहिले. त्यानंतर भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे ते प्रदेश चिटणीस राहिले. त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष अशीही जबाबदारी त्यांच्याकडे आली. निष्ठावान कार्यकर्ता, अभ्यासू व थेट लोकांमध्ये मिसळणारा असा त्यांचा नावलौकिक आहे.
हेही वाचा… डॉ. किरण लहामटे : अफाट जनसंपर्क
उदगीरच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ते सहसचिव नंतर २०१९ मध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तसा मराठवाडा साहित्य परिषदेशीही त्यांचा चांगला संपर्क. ते मसापचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य झाले. ४०व्या मराठवाडा साहित्य संमेलन तसेच उदगीर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले व्यवस्थापन अनेकांच्या लक्षात राहिले. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तीन हजारांहून अधिक रुग्णांची विविध शिबिराद्वारे त्यांनी सेवा केली. रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रमांचे दरवर्षी ते आयोजन करतात. अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी १० टक्के आरक्षण शासनाकडून त्यांनी जाहीर करून घेतले. कापूस व ज्वारीच्या भाववाढीसाठी आंदोलन केले. भाजप युवा मोर्चाच्या वतीने पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे मेळावेही त्यांनी घेतले. त्यानंतर उदगीर विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाला. त्यांनी सुधाकर भालेराव यांच्या प्रचारासाठी आपले योगदान दिले. सतत लोकात मिसळणारा हा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.