एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील सुमारे ३१२ कोटींच्या घोटाळ्यात अडकलेले महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम यांचे जामिनावर सुटून आल्यानंतर त्यांचे मोहोळ परिसरात झालेले जंगी स्वागत, त्यात तरूणाईचा एखाद्या उत्सवासारखा दिसलेला सहभाग थक्क करणारा आहे.
२०१४ साली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ राखीव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले रमेश कदम हे मूळचे तसे मोहोळचे नाहीत. तरीही आठ वर्षे तुरूंगात राहून जामिनावर सुटल्यानंतर कदम यांचे मोहोळच्या तरूणाईने वाजतगाजत जल्लोषात केलेले स्वागत पाहता रमेश कदम हेच बेरोजगार तरूणांचे आदर्श लोकनायक आणि तारणहार ठरले की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे कदम यांच्यासारख्या तरूणांच्या आधुनिक तारणहाराच्या स्वागतासाठी कोणताही राजकीय पक्षात लाल गालिचे अंथरले जातात. यात कोणत्याही पक्षाला ही बाब निषिध्द नाही, हेच दिसून येते. मोहोळमध्ये कदम यांच्या स्वागतासाठी राज ठाकरे यांच्या मनसे संघटनेनेही डिजिटल फलक, कमानी उभारल्या होत्या. स्वतः कदम यांनीही, आपणांस जवळपास सर्व राजकीय पक्षांनी प्रवेशासाठी निमंत्रण दिले आहे. आपण मोहोळच्या आम जनतेला विश्वासात घेऊन पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार असल्याचे जाहीर केले आहे. विधानसभेची निवडणूक मोहोळ राखीव मतदारसंघातूनच लढविणार असल्याचा ठाम निर्धारही त्यांनी बोलून दाखविला आहे. त्यामुळे मोहोळमध्ये राजकीय वादळ पुन्हा घोंगावण्याची चिन्हे दिसत आहेत.
हेही वाचा… अण्णा द्रमुकने युती तोडल्याने भाजपपुढे तमिळनाडूत आव्हान
तसे पाहता मोहोळचे नाव अनेक दशकांपासून राजकारणातील गुन्हेगारीसाठी कुविख्यात होते. अलीकडे रक्तरंजित राजकारणाची पार्श्वभूमीही याच मोहोळला लाभली होती. रमेश कदम हे २०१४ साली आमदार होऊन एक-दीड वर्षही लोटत नाही, तोच आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. आमदार म्हणून अत्यल्प कालावधीत समाजात वावरायला आणि कामे करता आली. टंचाई काळात मागेल त्या गावात पाणी आणि रस्ता ही कामे त्यांना धडाक्याने करता आली. आठ वर्षांनंतर जामीन मिळाला. पण इतक्या अंतरात त्यांचे वलय कायम असल्याचे त्यांच्या स्वागतावरून दिसून आले.
हेही वाचा… एमआयएम महिला विरोधी, खासदार जलील यांना अडचणीत आणण्याची भाजपची खेळी
मुंबईत राहणारे रमेश कदम हे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे मूळ समर्थक. त्यांचाच हात पकडून ते इतके मोठे झाले की नंतर ‘ गुरूची विद्या गुरूला ‘ या म्हणीप्रमाणे २०१४ साली मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून प्रा. ढोबळे यांचा पत्ता कापून स्वतः आमदार झाले. सोबत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही होते. मोहोळ भागातील बहुसंख्य पुढा-यांना न दुखावता त्यांची पाहिजे तशी सेवाही त्यांनी केली होती. काही पुढा-यांना तर त्यांनी आलिशान मोटारगाड्याही दिल्या होत्या. मात्र आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा घोटाळा उजेडात आला आणि चौकशीचे सत्र सुरू झाले तेव्हा कदम यांच्याकडून लाभ घेतलेल्या पुढा-यांचेही धाबे दणाणले होते. घेतलेले लाभ तात्काळ परत करणे त्यांना भाग पडले होते. दुसरीकडे तुरूंगात राहूनही कदम यांची राजकीय महत्वाकांक्षा थांबत नव्हती. मागील २०१९ सालची मोहोळ विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून तुरूंगातून लढविली होती. तेव्हा त्यांना २५ हजारांहून जास्त मते मिळाली होती.
हेही वाचा… पुणे भाजपवर घराणेशाहीचा पगडा, जुनेजाणते घरी
या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या राजकीय नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. इकडे मोहोळ तालुक्यातील बडे राजकारणी, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्यासह बहुसंख्य मंडळींनी सत्तासुंदरीला पसंत करीत अजितनिष्ठा दाखविली. बदलत्या राजकीय समीकरणांनंतर आता वादग्रस्त रमेश कदम हे पुन्हा याच मोहोळची विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत.