Delhi’s Ramlila Maidan केजरीवाल यांच्यावरील अटकेच्या कारवाईविरोधातन इंडिया आघाडीने आज दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन केले. या कार्यक्रमात बोलताना आम आदमी पार्टी (आप) नेते गोपाल राय यांनी रामलीला मैदानाचे वर्णन ‘चळवळीचे जन्मस्थान’ असे केले होते. २०११ मध्ये याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आमरण उपोषण सुरू केले होते. लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकारने समिती स्थापन करावी, अशी त्यांची मागणी होती; जी सरकारने पूर्ण केली. अण्णा हजारे राजकीय नेत्यांना आपल्या आंदोलनापासून दूर ठेवायचे; परंतु या आंदोलनांमुळे अनेक आंदोलनकर्ते नेते झाले, त्यात अरविंद केजरीवाल यांच्याही नावाचा समावेश होता. या आंदोलनानंतरच त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली.
१९ व्या शतकात रामलीलाचे आयोजन
रामलीला मैदानाचा इतिहास फार जुना आहे. हा इतिहास १९३० च्या दशकाच्या सुरुवातीचा आहे. रामलीला मैदान नवी दिल्ली आणि जुन्या दिल्लीच्यामध्ये स्थित एक तलाव बुजवून तयार करण्यात आले होते. इतिहासकार नारायणी गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, १९ व्या शतकात अजमेरी गेटजवळील या मैदानावर रामलीलाचे आयोजन केले जायचे. परंतु, मिरवणूक पाहता यावी म्हणून शेवटचे मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी स्वत: या मार्गात बदल करण्याचे आदेश दिले होते. दिल्लीत १८३७ ते १८५७ पर्यंत जफरची राजवट होती. १८७६ पर्यंत चांदणी चौकातून मिरवणूक काढून आज रामलीला मैदानापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गेटबाहेर रामलीला साजरी करण्याची प्रथा होती. गेल्या अनेक दशकांमध्ये या मैदानावर अनेक उत्सव, परिषद, सभा आणि ऐतिहासिक आंदोलने झाली.
ऐतिहासिक आंदोलनांचे ठिकाण
१९७५ मध्ये जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी सरकारविरोधात आंदोलन केले. इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत गैरवर्तन केल्याचा आरोप करीत, नारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने रायबरेलीमधून इंदिरा गांधी यांचा विजय रद्द केला. यादरम्यान इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा यासाठी जयप्रकाश नारायण यांनी २५ जून रोजी रामलीला मैदानावर एक विशाल सभा बोलावली. त्यांच्या भाषणानंतर काही वेळातच इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली. त्याच रात्री जयप्रकाश नारायण यांना जेव्हा तुरुंगात नेण्यात आले, तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांच्या कृतींबद्दल “विनाशकाले विपरीत बुद्धी (एखाद्याचा विनाश जवळ येतो तेव्हा त्याची बुद्धी त्याच्या हिताविरुद्ध काम करते)” अशी टिप्पणी केली होती.
१९७७ मध्ये नारायण लाखो लोकांसह दुसऱ्या मोठ्या सभेला संबोधित करण्यासाठी पुन्हा रामलीला मैदानावर परतले. ‘स्वातंत्र्य आणि गुलामगिरी’ यापैकी एक निवडण्याची संधी गमावू नका, असे आवाहन त्यांनी लोकांना केले. जनता पक्ष किंवा काँग्रेस यांच्यापैकी निवडणुकीत कोण विजयी होणार, हा प्रश्न नाही, तर तुम्ही, तुमची मुले आणि देश स्वतंत्र होणार की गुलाम, हा प्रश्न आहे, अशा स्वरूपाचे वक्तव्य करीत त्यांनी लोकांना संबोधित केले. त्याच वर्षी जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला आणि केंद्रात पहिले बिगरकाँग्रेस सरकार स्थापन झाले.
गोपाल राय यांनी सांगितल्याप्रमाणे, आपचे मूळच रामलीला मैदान आहे. २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनाला सुरुवात केली होती. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन हे आप व केजरीवाल यांच्यासाठी दिशादर्शक ठरले आणि दोन वर्षांनंतर त्यांनी दिल्लीत सरकार स्थापन केले. रामलीला मैदान हे निवडणुकीदरम्यान पक्षांकडून राजकीय सभांसाठी वारंवार वापरले जात असले तरी ते सामान्यतः आंदोलनासाठीचे लोकप्रिय ठिकाण आहे. गेल्या वर्षभरात रामलीला मैदानावर अनेक मोठी आंदोलने झाली. जून २०२३ मध्ये केजरीवाल यांनी एका सभेला संबोधित केले; जेथे त्यांनी दिल्ली सरकारला बाजूला करण्यासाठी अध्यादेश आणल्याबद्दल केंद्रावर हल्ला केला आणि सरकारचे वर्णन ‘हुकूमशाह’ म्हणून केले.
ऑक्टोबर २०२३ मध्ये जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याची मागणी करणाऱ्या हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पेन्शन प्रणालीविरोधात निदर्शने केली. या महिन्याच्या सुरुवातीला पंजाब आणि हरियाणातील शेकडो शेतकरी किमान आधारभूत किंमत मिळविण्यासाठी केंद्र सरकारविरोधात दिल्लीतील रामलीला मैदानाकडे निघाले. रामलीला मैदान गेल्या दशकांमध्ये अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे.