नागपूर : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही नरसिंह राव यांनी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्या रामटेक लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. लोकसभेप्रमाणेच विधानसभाही सर करण्यासाठी पक्ष कामाला लागला. लोकसभेच्या युद्धात काँग्रेस जिंकली, पण विधानसभेच्या जागा वाटपाच्या शिवसेनेसोबतच्या तहात हरली. जिंकून येण्याची खात्री असतानाही काँग्रेसला ही जागा आपल्या पदरी पाडून घेता आली नाही. विदर्भाच्या मागासलेपणासाठी जी काही कारणे आहेत, त्यात ऐनवेळी या भागातील नेतृत्वाने शेपुट घालणे हेसुद्धा एक कारण आहे. रामटेकची जागा शिवसेनेला सोडणे हे त्यापैकीच एक उदाहरण ठरावे.

रामटेक हा तसा काँग्रेसचाच बालेकिल्ला. १९५७ ते १९९६ या ३९ वर्षांत ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात फक्त १९७४ चा अपवाद सोडला तर येथून काँग्रेसच विजयी झाली.१९९९ मध्ये प्रथम शिवसेनेने रामटेकवर झेंडा फडकावला, त्यानंतर २००४, २००७ ची पोटनिवडणूक सेनेने जिंकली. मात्र २००९ मध्ये काँग्रेस जिंकली. नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सेना जिंकली व २०२४ मध्ये पुन्हा काँग्रेस जिंकली. हा आढावा घेण्यामागे एकच कारण आहे की हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, असा जो प्रचार केला जातो तो खरा नाही. पण तरीही शिवसेनेने त्यांच्या आक्रमक प्रचार शैलीने रामटेक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे ही बाब विधानसभेच्या जागा वाटपात अधोरेखित करण्यात यश मिळवले आणि रामटेकजी जागा पदरात पाडून घेतली.

हेही वाचा – भंडाऱ्यात महायुतीतील नाराजीच्या ठिणगीचे वनव्यात रुपांतर! नरेंद्र भोंडेकर यांच्याविरोधात इच्छुकांची अपक्ष लढण्याची तयारी

मुळातच विदर्भात मोजक्यात क्षेत्रात प्रभाव राखून असलेल्या शिवसेनेत फूट पडल्यावर त्यांची ताकद निम्म्यावर आली. रामटेकचे सेनेचे विद्यमान खासदार शिंदेसोबत गेले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडे रामटेकसाठी उमेदवार नव्हता. दुसरीकडे काँग्रेस या मतदारसंघात भक्कम स्थितीत असल्याने त्यांनी निवडणुकीची तयारी फार पूर्वीपासून केलेली, त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून रामटेक लोकसभेची जागा मागितली. पक्षाची अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने ही जागा काँग्रेससाठी तर सोडली पण, उपकाराच्या भावनेतून. पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यापुढे ठेवून. रामटेक लोकसभा काँग्रेसने जिंकली. विशेष म्हणजे या मतदारसंघात मोदींनी सभा घेऊनही काँग्रेसने बाजी मारली. मतदारसंघातील रामटेकसह सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने रामटेकवर दावा केला. पण शिवसेनेने रामटेक हा सेनेचा बालेकिल्ला आहे आणि लोकसभेत आम्ही तुम्हाला ही जागा सोडली म्हणून तुम्ही जिंकू शकले ही बाब भक्कमपणे मांडली आणि जागा स्वत:च्या पदरात पाडून घेतली. जागा जिंकण्याच्या सर्व निकषावर खरी उतरत असतानाही काँग्रेसला आपली बाजू आक्रमकपणे मांडता न आल्याने जिंकता येऊ शकणारी जागा सोडावी लागली. युद्धात जिंकले पण तहात हरले म्हणतात ते हेच.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात अजित पवार, शिंदे, ठाकरेंच्या पक्षांना भोपळा! एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्ते अस्वस्थ

उमेदवार नसताना सेनेला जागा

शिवसेनेकडे रामटेक विधानसभेसाठी प्रबळ असा उमेदवार नव्हता. पण तरीही त्यांनी आग्रही भूमिका घेत ही जागा घेतली. तेथे विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. ते निवडणुकीच्या राजकारणात नवखे आहेत. त्या तुलनेत काँग्रेसकडे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासारखा तगडा उमेदवार होता. पण वाटाघाटीला बसलेल्या नेत्यांना पक्षाची बलस्थाने मांडता न आल्याने ही वेळ आली.