Uttar Pradesh Rana Sanga Controversy : महाराष्ट्रात ज्या शब्दावरून वाद सुरू झाला, त्याच शब्दावरून उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरणही तापलं आहे. समाजवादी पार्टीचे (सपा) खासदार रामजी लाल सुमन यांनी राजपूत शासक राणा सांगा यांना संसदेत ‘गद्दार’ असं म्हटलं होतं. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. बुधवारी (२६ मार्च) करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमन यांच्या आग्रा येथील घरावर हल्ला केला. यावेळी अनेक वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्यानं पुढील अनर्थ टळला. आता भाजपा नेत्यांनी या वादात उडी घेतली असून समाजवादी पक्षाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशात ‘सपा’ची कोंडी?

रामजी लाल सुमन हे दलित नेते असून त्यांची उत्तरप्रदेशात मोठी ताकद आहे. दलित-मुस्लीम समुदायातील मतदारांचा त्यांना पाठिंबा आहे. तर दुसऱ्या बाजूला त्यांना विरोध करणारा राजपूत समुदाय आहे. ज्यांच्या रोषामुळं गेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अनेक जागांवर फटका बसला होता. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे शिल्लक आहे. त्यामुळे राजपूत समुदायाची मतं विरोधात जाऊ नये, असा समाजवादी पार्टीचा प्रयत्न आहे. अशातच सुमन यांनी केलेल्या वक्तव्यामुळं अखिलेश यादव यांची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी ‘सपा’ला लक्ष्य केलं आहे.

अखिलेश यादव काय म्हणाले?

दरम्यान, करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमन यांच्या आग्रा येथील घरावर हल्ला केल्यानंतर अखिलेश यादव हे आठवडाभरात दुसऱ्यांदा त्यांच्या मदतीला धावून आले. “रामजी लाल सुमन हे दलित असल्यामुळं त्यांना लक्ष्य केलं जात आहे. समाजवादी पक्ष मेवाडच्या राजपुत्र राणा सांगाच्या शौर्य आणि देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करत नाही. आमचा हेतू राजपूत समाजाचा किंवा इतर कोणत्याही समाजाचा अपमान करणे नाही. भाजपा काही ऐतिहासिक संदर्भाचा उपयोग आपल्या राजकीय फायद्यासाठी आणि धर्म व जातीय तेढ पसवण्यासाठी करीत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

आणखी वाचा : Maharashtra Politics : कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड कोणाकडून? शिंदेंच्या १२ शिलेदारांची नावे दृष्टिपथात

मुख्यमंत्री योगींना केलं लक्ष्य

रविवारी आपल्या विश्वासू सहकाऱ्याचा बचाव करताना अखिलेश यादव म्हणाले, “प्रत्येकजण इतिहासाची पाने उलटत आहेत. भाजपा नेत्यांना विचारा, ते कोणती पानं उलटत आहेत? ते काय चर्चा करत आहेत? त्यांना औरंगजेबाबद्दल बोलायचं आहे. जर रामजी लाल सुमन यांनी इतिहासातील एखाद्या पानाचा उल्लेख केला ज्यात काही तथ्ये दिली आहेत, तर त्यात काय चुकीचं आहे? आपण २०० वर्षांपूर्वी इतिहास लिहिला नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, ज्यावेळी सुमन यांच्या घरावर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही आग्रा येथे होते. यावरून अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. “एका अनुभवी आणि दलित खासदाराच्या घरावर हल्ला झाला. त्यावेळी मुख्यमंत्री जवळच होते. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं हे सर्व घडलं. मुख्यमंत्र्यांच्या नकळत हा हल्ला झाला हे कसे शक्य आहे?” असा प्रश्न अखिलेश यांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांकडून शेकडो आंदोलकांवर गुन्हे

दरम्यान, रामजी लाल सुमन यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी आग्रा पोलिसांनी गुरुवारी शेकडो जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील काहीजणांना अटकही करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव यांनी असा आरोप केला की, हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि अधिकाऱ्यांना याची संपूर्ण माहिती होती. म्हणूनच त्यांनी जमावाला रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. अखिलेश यादव यांच्याप्रमाणेच रामगोपाल यांनीही प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

‘सपा’ नेत्यांचा आरोप काय?

“मुख्यमंत्री जवळच एका कार्यक्रमात उपस्थित होते, परंतु प्रशासनाने या प्रकरणात काही कारवाई केली नाही. हल्लेखोर बुलडोझर, लाठ्या, काठ्या आणि शस्त्रांसह आले होते, तरीही त्यांना पोलिसांनी रोखलं नाही. यावरून आपण काय निष्कर्ष काढावा? हल्लेखोरांना सरकारचे पूर्ण समर्थन होते,” असं रामगोपाल यादव यांनी म्हटलं आहे. पुढच्या आठवड्यात ईदनंतर समाजवादी पक्ष हल्ल्याचा निषेधार्थ आंदोलन करणार आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समुदायातील नागरिक या आंदोलनात सहभागी होतील, असंही ते म्हणाले.

हेही वाचा : Nitin Gadkari : नितीन गडकरींनी खासदाराच्या मुलाला दिला ‘हा’ सल्ला; उपस्थितांमध्ये पिकला एकच हशा

लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांनी पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी पीडीपी मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समुदायातील मतदारांना एकत्रित आणलं होतं. ज्यामुळं समाजवादी पार्टीला अभूतपूर्व यश मिळालं. उत्तर प्रदेशातील ८० पैकी ३७ जागांवर सपाचे उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे, तिकीट वाटपावरून पश्चिम उत्तर प्रदेशातील झालेल्या नाराजीनाट्यामुळं राजपूत राजपूत (ठाकूर) समुदायानं भाजपाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. त्यामुळं पक्षाला केवळ ३३ जागांवरच विजय मिळवता आला. उत्तर प्रदेशात राजपूत समुदायाचे सहा टक्के मतदार असल्याचं सांगितलं जात आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपानं राज्यातील ६३ जागांवर विजय मिळवला होता.

ठाकूरांना चिथावणी दिल्याचा भाजपाचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाच्या काही नेत्यांनी सरधानाचे माजी आमदार संगीत सिंग सोम यांच्यावर ठाकूरांना चिथावणी दिल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे मुझफ्फरनगरमधील पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार संजीव कुमार बाल्यान यांना पराभवाचा धक्का बसला. ठाकूरांमध्ये निर्माण झालेल्या द्वेषामुळं भाजपानं केवळ मुझफ्फरनगरच नव्हे, तर सहारनपूर आणि कैरानाची जागाही गमावली होती. याशिवाय मेरठ आणि मथुरा मतदारसंघात पक्षाचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले होते. ठाकूर मुद्द्यामुळं सातही टप्प्यात पक्षाचं मोठं नुकसान झालं, असं भाजपाच्या एका नेत्यानं त्यावेळी म्हटलं होतं.

उत्तर प्रदेशातील मतदार कुणाच्या पाठिशी?

उत्तर प्रदेशच्या राजकारणात राजपूतांचा किती प्रभाव आहे याची जाणीव समाजवादी पार्टीला आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे मतदार पक्षापासून दूर जाऊ नये, असा प्रयत्न अखिलेश यादव यांचा आहे. म्हणूनच त्यांनी भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय ते राजपूत समुदायाला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. दलित आणि मुस्लीम समुदाय दुरावला जाऊ नये म्हणून अखिलेश यादव हे रामजी लाल सुमन यांच्या मदतीलाही धावून जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील मतदार आगामी निवडणुकीत कोणाच्या पारड्यात भरभरून मतं टाकणार, याकडं सर्वाचं लक्ष लागून आहे.