एजाज हुसेन मुजावर

आगामी माढा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यात शह-काटशहाचे राजकारणाने जोर धरला असताना मोहिते-पाटील यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतःची ताकद वाढविण्याच्यादृष्टीने बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. विशेषतः एकादगडात दोन पक्षी मारण्याचा त्यांचा बेत समोर आला आहे. करमाळा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून मोहिते-पाटील गटाने तसे संकेत दिल्याचे मानले जाते.

Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
maharashtra assembly election 2024 fight between Rohit Pawar and Ram Shinde will be significant
रोहित पवार-राम शिंदे यांच्यातील लढत लक्षणीय
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’

वर्षानुवर्षे गटा तटाच्या राजकारणासाठी चर्चेत राहणाऱ्या करमाळा तालुक्यात, कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपचे नेते आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व धैर्यशील मोहिते-पाटील हे यशस्वी झाले. शिवाय तालुक्याच्या राजकारणात त्यांचे महत्व अधोरेखित झाले आहे. आगामी करमाळा विधानसभा निवडणुकीचा विचार करताना मोहिते-पाटील गटाने आपले ‘ लक्ष्य ‘ आमदार संजय शिंदे असणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

आणखी वाचा-हरियाणा : भाजपाचा बडा नेता मांडणार वेगळी चूल? २ ऑक्टोबरला मोठ्या सभेचे आयोजन !

करमाळा कृषिउत्पन्न बाजार समितीची सत्ता वर्षानुवर्षे माजी आमदार जयवंत जगताप यांच्या ताब्यात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांचे कट्टर शत्रू मानले जाणारे पवारांचे अनुयायी अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या विजयासाठी जयवंत जगताप यांनी मोलाचा वाटा उचलला होता. या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांनी करमाळा कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयवंत जगताप यांच्यासह माजी आमदार नारायण पाटील व रश्मी बागल या एरव्ही एकमेकांना नेहमीच पाण्यात पाहणा-या नेत्यांना एकत्र आणले आणि त्यांच्यात समझोता घडवून आणला. १८ जागांपैकी सर्वाधिक १४ जागा जगताप गटाला तर उर्वरीत ४ जागा नारायण पाटील व रश्मी बागल यांनी निम्म्या-निम्म्या वाटून घेतल्या. आमदार संजय शिंदे यांनी जगताप गटासाठी पूर्वीच माघार घेतली होती. परंतु एकंदर निवडणूक बिनविरोध होऊन जगताप, पाटील व बागल यांना एकत्र आणण्यात मोहिते-पाटील यांनी बजावलेली भूमिका वरचढ दिसून आली.

करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजय शिंदे यांची स्वतःची ताकद राहिलेल्या माढा तालुक्यातील कुर्डूवाडीसह ३६ गावांचा समावेश आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे आमदार संजय शिंदे यांचे बंधू आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या माढा तालुक्यातील भागावर एखाद दुसरा अपवाद वगळता शिंदे बंधुंचे निर्विवाद वर्चस्व टिकून आहे. त्याच बळावर आणि करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मदतीने संजय शिंदे यांनी मागील करमाळा विधानसभा निवडणूक ५४९४ इतक्या मताधिक्याने जिंकली होती. त्यावेळी त्यांना पराभूत करण्यासाठी मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले होते.

आणखी वाचा-जिजाऊंच्या जिल्ह्यात उमेदवारीत महिला दुर्लक्षित

एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणात सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील आणि नामदेवराव जगताप असे दोनच गट होते. जगताप यांच्या करमाळ्यात मोहिते-पाटील यांची ताकद कायम राहिली असून जगताप यांच्या पश्चात त्यांचे पुत्र जयवंत जगताप हे परिस्थितीनुसार मोहिते-पाटील यांचे कधी विरोधक तर कधी मित्र राहिले आहेत. माजी आमदार नारायण पाटील हे मोहिते-पाटील गटाचे असूनही २०१४ साली विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून तत्कालीन शिवसेनेकडून निवडून आले होते. तालुक्याच्या राजकारणावर आपला प्रभाव कायम राहील याची दक्षता मोहिते पाटील यांनी आजवर घेतलेली आहे. तेथील आघाड्या, तडजोडी तात्पुरत्या असतात. परिस्थितीप्रमाणे त्यात सोयीस्कर राजकीय भूमिका घेणे हा येथील राजकारणाचा स्थायीभाव दिसून येतो.

जिल्ह्याच्या राजकारणात माढ्याचे दिवंगत माजीआमदार विठ्ठलराव शिंदे यांच्यापासून शिंदे घराणे हे मोहिते-पाटील यांचे समर्थक होते विठ्ठलराव शिंदे यांना १९७२ च्या माढा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यापासून ते जिंकण्यापर्यंत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप-सेना युतीचा प्रभाव असताना बबनराव शिंदे यांना शरद पवार यांचा विरोध डावलून अपक्ष आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु शरद पवार यांनी बबनराव शिंदे यांना जवळ करून त्यांचा वापर मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी सुरू केला. यात शिंदे बंधुंना ताकद मिळाली. पवार काका-पुतण्याच्या प्रोत्साहनामुळे मोहिते-पाटील विरोधी सत्तासंघर्षाचे सूत्रधार म्हणून संजय शिंदे यांनी बजावली. त्यातून जिल्हा परिषदेसह अन्य काही संस्थांमध्ये समविचारी आघाडीच्या नावाखाली संजय शिंदे यांच्या माध्यमातून मोहिते-पाटील यांना सत्तेच्या राजकारणात रोखण्याचा प्रयत्न झाला होता. किंबहुना जिल्ह्याच्या राजकारणातील मोहिते-पाटील यांचा शब्द प्रमाण मानण्याचे दिवस संपले. या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांच्या विरोधामुळे संजय शिंदे यांना २०१४ साली करमाळा विधानसभा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. तत्पूर्वी, २०१९ च्या माढा लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांचा पराभव झाला होता. परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील व रश्मी बागल या दोघांच्या तुल्यबळ लढतीचा लाभ उठवत संजय शिंदे यांनी बाजी मारली होती.

आणखी वाचा-मराठा आरक्षण आणि ओबीसी प्रश्नावरून सरकार कात्रीत

मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी लक्षात घेऊन संजय शिंदे यांच्या विरोधात मोहिते-पाटील हे रणनीती आखत असून करमाळ्यातील दिग्विजय व रश्मी बागल, माजी आमदार नारायण पाटील व जयवंत जगताप यांना एकत्र आणून कृषिउत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करणे हा याच रणनीतीचा भाग मानला जातो. तथापि, आमदार संजय शिंदे हेसुध्दा तेवढेच सजग असून जयवंत जगताप यांना मोहिते-पाटील यांच्या गोटात जाऊ न देता स्वतःच्या प्रभावाखाली ठेवतील, असेही म्हटले जाते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा विचार करता मोहिते-पाटील यांनीही एका दगडात दोन पक्षी मारण्याची रणनीती आखायला सुरूवात केल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील भाजपच्या वर्तुळात पुढे काय वाढून ठेवले आहे, याचा नेमका अंदाज बांधणे अशक्य असल्याचे सांगितले जाते.