लक्ष्मण राऊत, लोकसत्ता
जालना: भाजपने लोकसभा मतदारसंघात जून महिन्यात विशेष जनसंपर्क अभियान राबविण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या संदर्भात व्यापक जनसंपर्क करण्यास प्रारंभ केला आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे सलग पाच वेळेस निवडून आलेले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा तीन लाख ३२ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता. परंतु २०२४च्या निवडणुकीसाठी मात्र त्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना होता. आगामी २०२४ च्या निवडणुकीत ही उणीव भरून काढण्यासाठी त्यांचे नियोजन आहे.
काही भाजप कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ही उणीव भरून काढण्यासाठी परंपरागत नसलेले नवीन मतदार जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस इत्यादी विरोधी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वगळून या पक्षांतील काठावरील कार्यकर्ते तसेच मतदारांशी संपर्क त्यासाठी करण्यात येत आहे. दोन-तीन गावांतील अशा ‘काठांवरील’ मतदारांची बैठक घ्यायचे नियोजन आहे. भाजपशी संबंधित नसलेले किमान ३०० काठावरील मतदार अशा बैठकीसाठी आणण्याची जबाबदारी त्या भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येत आहे. अशा इतर पक्षांतील मतदारांना आमंत्रित करून जवळपास २० बैठका जालना लोकसभा मतदारसंघातील फुलंब्री, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड तालुक्यांत झाल्या आहेत. यापैकी बहुतेक बैठकांना स्वत: दानवे उपस्थित होते. नुकतीच दानवे यांची अशी बैठक बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे दानवेंच्या उपस्थितीत झाली. मागील वेळेस आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आलो होतो. त्यावेळी सोबत असलेली शिवसेना (उद्धव ठाकरे) आता आपल्यासोबत नाही, याची जाणीव या बैठकीत कार्यकर्त्यांना करून देण्यात आली.
आणखी वाचा-आमदारकीवरून खानापूर-आटपाडीत राष्ट्रवादीतच फंदफितूरी
रेल्वे राज्यमंत्री पदामुळे राज्याच्या बाहेरील कार्यक्रमांची व्यस्तता असली तरी दानवे यांनी अलिकडच्या काळात मतदारसंघातील उपस्थिती वाढविलेली आहे. महिनाभरापूर्वी त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डी येथे घेतली होती. दिवसभर चाललेल्या या चिंतन बैठकीस जालना लोकसभा मतदारसंघातील ५००पेक्ष अधिक पदाधिकारी उपस्थित होते. विषय अर्थातच आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील मतांच्या नियोजनाचा होता.
२०१९ च्या निवडणुकीत दानवे यांना सिल्लोड विधानसभा क्षेत्रात काँग्रेसपेक्षा जवळपास ८० हजारांचे मताधिक्य होते. विशेष म्हणजे सिल्लोडमध्ये ‘नोटा’ची १५ हजार ६३७ मते पडली होती. ‘नोटा’ला पडलेली मते भाजपची परंपरागत मते नव्हती आणि ती काँग्रेससाठी नुकसानदायक ठरली, असे मानले जाते. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत दानवेंना सिल्लोडसह पैठण आणि फुलंब्रीमध्ये आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी नियोजन करायचे असून त्याची सुरुवात झाली आहे. भाजपच्या जुन्या परंतु आता सक्रिय नसलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेण्याचा कार्यक्रमही या जनसंपर्क कार्यक्रमाचा भाग आहे.
आणखी वाचा-मविआच्या जागावाटपाच्या चर्चेआधीच काँग्रेसने बाह्या सरसावल्या; ४१ लोकसभा मतदारसंघांचा घेतला आढावा
लोकसभा मतदारसंघात ३०० प्रभावशाली कुटुंबाशी संपर्क, एका मोठ्या नेत्याची जाहीर सभा, विचारवंतांची बैठक, व्यापारी संमेलन, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा, मतदान केंद्रनिहाय जनसंपर्क इत्यादी पक्षाने दिलेले कार्यक्रम येत्या महिनाभरात दानवे राबविणार आहेत. परंतु पक्षाच्या कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त मतदारसंघाच्या पातळीवर त्यांचे स्वत:चे कार्यक्रमही असतात. विधानसभेच्या दोन आणि लोकसभेच्या पाच निवडणुका सलग जिंकल्यामुळे त्यांना मतांची बेराज करण्यात वाकबगार मानले जाते. निवडणूक आली की, प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराच्या एखाद्या प्रमुख पुढाऱ्याच्या ‘हातात कमळ’ कसे द्यायचे याचा अनुभव दानवेंना आहे. २०१९ च्या निवडणुकीत सोबत असणारे शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) पदाधिकारी आणि कार्यकर्ते २०२४ मध्ये सोबत असणार नाही याची जाणीव साहजिकच दानवे यांना असेल. त्यामुळेच मतांची ही उणीव भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या विरोधी पक्षांतील कट्टर नसलेले ‘काठावरील’ कार्यकर्ते आणि मतदार आपल्याकडे आकर्षित करण्याचे धोरण भाजपमध्ये दिसून येत आहे.