छत्रपती संभाजीनगर : जालना लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यांनतर त्याचे चरंजीव संतोष दानवे यांना भोकरदन मतदारसंघातून तर त्यांची मुलगी संजना जाधव यांना कन्नड मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीमध्ये घेण्यात आला आहे.कन्नड लोकसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
कन्नड मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची होते. २०१४ मध्ये हषर्वधन जाधव यांनी या मतदारसंघातून ६२ हजार ५४२ मते घेऊन विजय मिळवला होता. तेव्हा उदयसिंह राजपूत यांना ६० हजार ९८१ मते मिळाली होती. ‘ धनुष्यबाण ’ चिन्ह मिळाल्यानंतर आपण विजयी झालो, या भावनेतून शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतरही उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यामुळे ‘ निष्ठावंत’ अशी उपाधी लावत शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांचा गौरव केला. २००४ पासून अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये लक्षणीय मते मिळविणाऱ्या उदयसिंह राजपूत यांच्यासमोर आता संजना जाधव यांचे आव्हान उभे असणार आहे.
हेही वाचा >>>Buldhana Assembly Constituency: शिवसेनेचे साडेतीन दशकांत प्रथमच स्त्री-दाक्षिण्य!
या मतदारसंघावर अनेक वर्ष रायभान जाधव यांचा वरचष्मा होता. राजकीय पटलावर रायभान जाधव यांच्या शब्दाला मान होता. पुढे त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधव यांनीही या मतदारसंघात विजय मिळवला. ते एकवेळा मनसेचे आमदार होते. रायभान जाधव यांच्या नावाने आघाडी करुन त्यांनी राजकारण केले. याच काळात संजना जाधव यांना एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार होत्या. आता त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली जाणार आहे.